पान:तरंग अंतरंग.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमचे नाना - माझ्या आधीच्या पिढीतली माणसं कुठल्या मातीची घडली होती कुणास ठाऊक! अत्युच्च नीतिमत्ता त्यांच्या रक्तात पुरेपूर भिनलेली होती. साधंच उदाहरण सांगतो मी सात-आठ वर्षांचा असताना दिवाळीच्या किल्ल्यासाठी परसदाराबाहेर नगरपालिकेने रस्त्यासाठी टाकलेली खड़ी माझ्या इवल्याशा ओंजळीत घेऊन मी घरात पाय टाकला आणि समोरूनच नाना म्हणजे माझे वडील येत होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच माझा थरकाप उडाला. "ही खडी तुझी आहे का ?" एवढाच प्रश्न त्यांनी विचारला. "मुकाट्याने बाहेर टाकून ये." पुढची आज्ञाही दिली. वास्तविक, माझ्या हातात १०० ग्रॅमपण खडी मावली नसेल; पण मला आयुष्यासाठी धडा मिळाला. आज मी खात्रीने तुम्हाला सांगू शकतो, दुसऱ्याचे एक कोटी रुपये सुद्धा मला मोहात पाडणार नाहीत. नानांची मोठी बहीण - बक्का ( नाव बकुळा असावे) नवव्या वर्षी लग्न होऊन, लगेचच विधवा होऊन परतली, ती कायमची. आई-वडील अगोदरच निवर्तलेले. दोन लहान भाऊ, दोन लहान बहिणी एवढी जबाबदारी तिच्यावर होती. त्यातच आई- वडिलांच्या निधनापूर्वी नानांचं लग्न झालेलं. 'व्हर्न्याकुलर फायनल' ( व्ह. फा. म्हणायचे तेव्हा ) झाल्यावर सरळ कारकुनाची नोकरी करण्याखेरीज जगणेच अशक्य होते. पण बारा-चौदा वर्षांच्या त्या विधवा बहिणीनं विचार केला की, महागावातच ( कोल्हापूर जवळील खेडे) आपले भाऊ राहिले, तर गावात पूजा सांगत आयुष्य घालवतील; आणि म्हणून तिने निर्णय घेतला की, सांगलीवाडीच्या (कृष्णा नदीपलिकडे) शेतात झोपडीत राहू; पण धाकट्या भावांचे शिक्षण झाले पाहिजे. एवढ्याशा चिमुरड्या मुलीची केवढी ती दूरदृष्टी ! महागाव - सांगली १०० किलोमीटर अंतर चालत, बैलगाडीतून कापून सांगलीवाडीच्या शेतात मंडळी पोचली. रोज अनवाणी पायांनी नदी क्रॉस करून नाना - काकांची शाळा सुरू झाली. त्यानंतर मॅट्रिक झाल्यावर नानांनी कारकुनाची नोकरी धरली. तिथल्या वरिष्ठांनी त्यांची हुशारी पाहून बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला नानांना दिला. तो सल्ला मानून नानांनी व्हेटर्नरी कॉलेजमध्ये मुंबईला अॅडमिशन घेतली. ब्रिटीश गव्हर्नमेंटची ४० रुपये शिष्यवृत्ती त्यांना मिळू लागली. ३० रुपये घरच्या खर्चासाठी पाठवून १० रुपये महिन्याला स्वतःच्या खर्चाला नाना ठेवत असत. व्हेटर्नरीच्या शेवटच्या वर्षाला असताना पहिल्या महायुद्धासाठी व्हेटर्नरी सर्जन्सची जरुरी लागल्याने चायनाला युध्दावर जाणाऱ्यांना परत आल्यावर डिग्री दिली. (२६ एप्रिल १९१८). आमच्या कुटुंबातील परदेशी जाणारी पहिली व्यक्ती म्हणजे आमचे नाना. त्यानंतर माझा भाऊ, माझा पुतण्या त्याच कॉलेजमधून बी. एस्सी. व्हेटर्नरी झाले. विशेष म्हणजे नानांची पणती तेजूने १०० वर्षांनी म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये उदगीरहून व्हेटर्नरी डॉक्टरची डिग्री घेतली आहे. तरंग अंतरंग / १०८