पान:तरंग अंतरंग.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुनः पुन्हा कोल्हापुरी लहानपणीची शाळकरी जीवनातली कोल्हापुरातली दहा वर्षे ही माझ्या आयुष्यातली, कोल्हापुराबद्दल, तिथल्या लोकांबद्दल अत्यंत जिव्हाळा निर्माण करणारी अशी होती. अनेक देशांत फिरणं झालं, भारतातही अनेक ठिकाणी चूल मांडून झाली; पण कोल्हापुरचं वास्तव्य हृदयात वेगळा कप्पा व्यापून आहे. बागल चौकाजवळच पांजरपोळाच्या विशाल जागेत, दगडी बांधकामातील जनावरांच्या मजबूत दवाखान्यातल्या तितक्याच ऐसपैस जागेत आम्ही राहत होतो. ती टुमदार बंगली होती, त्यात भलंमोठं आंब्याचं झाड आणि विशेष म्हणजे भोकराचं एक झाड होतं. हे सारं नुसतं कोल्हापूरचं कुणी नाव काढलं तरी डोळ्यांपुढे हुबेहूब उभं राहतं. गुजराती बायका पिकत आलेली टपोरी भोकरं लोणचं घालायला नेत असत. झाडावर चढून त्यांच्या विनवण्यांमुळे भोकरं तोडून खाली टाकणे हाही एक 'उद्योग' असे. पिकून लाल झालेली भोकरं थोडी गोड लागत; पण चिकटपणामुळे ती फार कधी मला आवडलीच नाहीत. पुढे, आयुष्यातली सत्तावीस वर्षे गुजरातमध्ये गेली. तेव्हा गुजराती मित्रांच्या घरून आलेलं हे भोकराचं लोणचं आवडीनं खाल्लं आणि कोल्हापुरी-गुजराती कुटुंबाचा भोकरांचा सोस लक्षात आला. आमच्या कोल्हापूरच्या या घराच्या पाठीमागे दोन-चारशे जनावरांचा स्वच्छ विशाल गोठा होता... आणि आता हसू येईल पण एवढ्या मोठा प्लॉटच्या दुसऱ्या टोकाला संडास होते. आम्ही तो दुसऱ्या गल्लीत आहे, असेच म्हणत असू. वेळी-अवेळी 'लायटनिंग कॉल' आल्यास हातात कंदील घेऊन, तोंडातून रामनामाचा जप करतच धाव घ्यायला लागे. गोठ्यातून सकाळच्या धारा काढून झाल्यावर, गोंडस वासरं उन्हात मोकळी सोडल्यावर कानात वारं शिरल्यासारखी उगीचच इकडून-तिकडे उधळत. त्यांची हालचाल मी एकटक मुग्ध होऊन पाहत असे; शिवाय आमच्या स्वतःच्या गोठ्यातही एक गीर गाय-वासरू होतेच. त्याच गोठ्यात कपडे वाळत घालायला दोऱ्या बांधलेल्या होत्या. मला त्यांचा खास उपयोग होता. दुपारी आई विश्रांतीस गेली की, दोरीवर वाळलेली चड्डी घेऊन मी या पांजरपोळाच्या आवारातच असलेली भली मोठी विहीर गाठत असे; विशेषतः रविवारी मुलांची, तरुणांची तिथे गर्दी असे. 'कृष्णा' काठावर वाढलेल्या माझ्या वडिलांनादेखील पोहण्याची विलक्षण आवड असल्याने या विहिरीवर कुणालाही पोहायला मज्जाव नसे. खंड्या पक्ष्याच्या चापल्याने देखणा सूर मारणारा एक तरुण (बहुधा पराडकर आडनावाचा ), हे माझे खास आकर्षण होते. 'त्या' म्हणजे वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच मी 'मोटवणा'वरून उडी मारल्यावर पायाची मांडी घालून 'गठ्ठा' मारत असे. पराडकर 'गठ्ठा' मारे. तेव्हा 'मोटवणा'पर्यंत पाणी कारंज्यासारखे उडत असे. माझं मात्र आपलं एक पसाभर पाणी वर फेकल्यासारखं उडे. बराच वेळ डुंबून झाले की, कुणाच्याही नकळत मी गोठ्यात परस्पर कपडे वाळत १०३ / तरंग अंतरंग