Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टाकून मोकळा होत असे. पोहण्याचे मला लागलेले 'व्यसन' हे कोल्हापुराने माझे पुरवलेले 'डोहाळे' होते. नंतरही सांगलीत विलिंग्डन कॉलेजमधल्या तशाच मोठ्या विहिरीत पीरिएडला बुट्टी मारून चार-पाच मित्रांसह डुंबत राहण्याचा 'चोरटा ' आनंद मी घेत असे. सांगलीला आल्यावर भर पुरात ५० फूट पाण्याची पातळी असताना, पोलिसांची बंदी असताना त्यांची नजर चुकवून पुलावरून उड्या मारण्याचा धाडसी आनंदही मिळवला. त्याचं मूळही ती कोल्हापुरातली विहीरच होती. शाहू मिल्स ही कोल्हापुरातल्या तमाम कामगार वर्गाची 'रक्तवाहिनी. ' माझा जिवलग मित्र असलेल्या उदयचे वडील तेथे जनरल मॅनेजर होते. ते अत्यंत दिलदार, मऊ हळुवार मनाचे. अख्ख्या कामगार वर्गाची ते पित्याप्रमाणे काळजी घेत. त्यामुळे ते अत्यंत आदरणीय होते. बहुधा रोज संध्याकाळी उदय माझ्याकडे येई. आमच्या गप्पा होत. नंतर मी त्याला पुन्हा परत पोहोचवायला जाई आणि परत तो मला... अशा अनेक फेऱ्या होत. उदय पुढे अमेरिकेहून M. Arch. झाला. नंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचा प्रिन्सिपॉल झाला. पण कोल्हापुरी माणसांतली गट्टी नाही विसरला. अजूनही ती दोस्ती इतर अनेक शाळकरी मित्रांप्रमाणे घट्ट आहे. कोल्हापूरच्या आई अंबाबाईला माझ्या हृदयात अढळस्थान आहे. अनेक वेळा पहाटे पाचची पूजा करण्याचं मिळालेलं भाग्य, ही माझी अचल संपत्ती आहे. हल्ली गाभाऱ्यात पूजा करता येत नाही; पण मध्यंतरी माझ्या नातवाच्या, विश्वेशच्या बँकेतील एका पुजारी मित्रामुळे 'आई'च्या पायावर डोकं टेकायला मिळालं आणि बऱ्याच काळाची राहिलेली इच्छा अंबाबाईने पुरी केली. अत्यंत प्रदीर्घ दर्शन घेताना मनात 'त्या' मूर्तीमधील आई पाहत उभे राहावे वाटते. आईसमोर प्रचंड गर्दी. भक्तगण डोळ्यांत खोलवर भरलेली अपार करुणा घेऊन दर्शन करताना मनातील सल, निराशा, संकट इतर कुणालाही कळून न देता, आईलाच सांगायचे दुःख सांगत असतात; म्हणून मला त्या वेळी आईच्या चेहऱ्यामागे कृपाशीर्वादाचा स्पष्ट भाव दिसतो आणि डोळे भरून येतात. ती आई सर्वांच्या मागे ठामपणे उभी आहे, असेच वाटते. संसारात सर्वांनाच दुःखं, अडचणी सतत असतातच. त्या दर्शनानं सुटतातच, असंही नाही. पण त्या अतूट श्रद्धेने मनाला एक वेगळी उभारी आई देते, एवढं निश्चित. आणि निश्चिंत मनाने भक्तगण बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा एक वेगळा आत्मविश्वास, वेगळं समाधान, उभारी पाहायला मला आवडतं आणि आईच्या दर्शनाची आस मनात सतत नंदादीपासारखी तेवत राहते. - कोल्हापुरात असताना बहुधा दर शुक्रवारी, उजव्या हातात शिसवी काठी घेऊन धोतर, कोट, टोपी धारण करून ताठ मानेने चपळपणे चालणाऱ्या माझ्या वडिलांच्या नानांच्या बरोबर मीही अंबाबाईला बागल चौकातून चालत जात असे. त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आदरामुळेच तेथील खजिनदाराने अंबाबाईचे सारे दागिने आम्हा दोघांना आत नेऊन दाखवल्याचे स्मरते. तेथून आम्ही घाटी दरवाजासमोरच राहणाऱ्या माझ्या तरंग अंतरंग / १०४