पान:तरंग अंतरंग.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझी सांगली १९४१ साली ६००० रुपयात सराफ गाडगीळांच्याकडे कुणीतरी गहाण ठेवलेला दुमजली बंगला वडिलांनी विकत घेतला. ...आणि या घरातला पहिला जन्म हा माझा झाला. नंतर दरवर्षी कुणा न कुणाचं बाळंतपण या घरानं जोजवलं! एका खोलीचं बाळंतिणींची खोली असं उत्साहाने नामकरणही झालं. 'हम दो, हमारा एक' चा तो जमाना नव्हता. ऑफिसवरून आईची वाट पाहत एकलकोंड रहायचा प्रश्नच नव्हता. लग्न, मुंजी, दिवाळी, मे महिन्याची सुट्टी म्हणजे नुसती धमाल! गोठ्यातल्या गाई शेतात जायच्या. सांगायचं राहीलचं. गाईचं धारोष्ण दूध म्हणजेच अमृत असावं अशी माझी ठाम समजूत त्यावेळी होती. फेसानं आलेल्या पांढऱ्या मिशा वाकड्या जीभेनं साफ करण्याची मजा काही औरच! तर गाई शेतात गेल्या की गोठा आरशासारखा झक्क करून तिथेच स्वयंपाकासाठी भली मोठी चुलवण मांडली जायची. सकाळी ७ ला तिथं घुसलेल्या आई, मावशा दुपारच्या चहा पर्यंत तिथंच असत. अगोदरच गोरीपान असलेली माझी आई त्या धगीनं लालेलाल व्हायची. आईच्या हातची पातळ गरम भाकरी राजालाही मिळण शक्य नाही. बरोबर घट्ट झुणका व निखाऱ्यावर भाजलेली हिरवीगार मिरची दही - मेतकुटात कालवून खाणं म्हणजे स्वर्गीय सूख होतं. आजवर ताजमधल्या जेवणालाही अशी चव कधी आली नाही. कधी कधी मुलांची सर्कस शेतात जायची. कानात वारं शिरलेल्या वासरागत हुंदडायची. कोवळ्या काकड्यांवर, कोवळ्या कणसांवर (हल्लीची २ बेबी कॉर्न असलेली दीड-दोनशे रुपयाची डिश) तुटून पडायची. मक्याचा हुरडा म्हणजे वरच्या हिरव्या पाल्यासकट जाळात भाजलेली कणसं ! अरे जगात या चवीचा एकही पदार्थ, नाही, म्हणजे त्रिवार नाही ! आणि मग पावसाळा आला की कृष्णेला पूर हा ठरलेला. लोकांनी नदीला वाहण्यासाठी नारळ टाकले की आम्ही चार-पाचजण बंदी असताना पण पुलावरून बेधडक त्या अफाट, मातीनं लाल झालेल्या पाण्यात उड्या ठोकायचो. नारळ पकडून पास करत देवळाच्या शिखरावर बसून फोडून खायचो. कष्टानं मिळवलेल्या त्या खोबऱ्याचा फडशा पाडून आम्ही पुन्हा पुलावर हजर! अशी पाटींची मजा चिकन-व्हिस्कीच्या पार्टीतही कधीच आली नाही. पुढं सांगली सुटली. गुजरातमध्ये बरीच वर्षं गेली. युरोप, अमेरिका, श्रीलंका, उझबेकिस्थान, जर्मनी अशा अनेक देशांच्या सफरी झाल्या. कैलास यात्रा झाली. कधीतरी दूर एकट बसलं की सारं बालपण डोळ्यांपुढून एखाद्या चित्रपटासारखं झरझर सरकू लागतं. जख्ख म्हातारपणी पण कट्ट्यावर बसून माझ्या आवडत्या पुरणपोळ्या करून वाढणारी आई डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूबरोबर पुसट होऊन, मन विषण्ण व्हायचं. आपण काय हरवून बसलो आहोत याची जाणीव पायात घुसलेल्या काट्यासारखी टोचतच रहायची. ...आणि नकळत जड पावले घराची वाट फरफटत ओढत रहायची!

तरंग अंतरंग / १०२