पान:तरंग अंतरंग.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाप्यानं जरा गुश्श्यातच उत्तर दिलं. 'अरे, मग काय वैद्यराज गेले काय ?' वरती बोट दाखवत मोहन वातावरण हलकं करण्यासाठी हसून म्हणाला. 'त्याला कशाला आण मारतोयस बाबा?' बाप्या अजून हुप्पच होता. 'नाही रे. गरज सरो आणि वैद्य मरो' म्हणतात. मी वैद्याला अजून सोडायला तयार नव्हतो. मग मात्र बाप्या एकदम गंभीर झाला आणि त्यानं गांभिर्यानं आपली कैफियत मांडली. ती अशी... जन्मभर आपण गरजा पुऱ्या करण्यात शरीर झिजवत असतो. भावा-बहिणींच्या, सासू-सासऱ्यांच्या, पावण्या -रावळ्यांच्या मुलाबाळांच्या तर कधी आपल्या सग्या- सोबत्यांच्या गरजा निर्माण करण्यात अर्ध आयुष्य जातं आणि त्या पुऱ्या करण्यात उरलेलं अर्धं ! एवढं करून त्याची जाणीव फक्त आपल्या शरीराला आणि उतरत्या वयात टोचत रहाणाऱ्या मनाला होते. एकंदरीत बाप्या बराच गंभीर झाला होता. मी प्रसंगाचं गांभीर्य कमी करायला म्हटलं, 'अरे एवढं तातडीनं बोलावून चहा तरी पाजणार आहेस की कोरोना काढा ?' तेवढ्यात ट्रेमधून चहा-बिस्किटे घेऊन बाप्याचा मुलगा आला. आमच्या तब्बेतीची वगैरे चौकशी केली आणि प्रत्येकाच्या हातात कप देऊन 'मला अंघोळ करून कामावर जायचंय' असे म्हणून आत गेला पण. नेहमी आपुलकीनं चौकशी करणारा आदब ठेऊन आपणहून आमच्या साऱ्या दोस्तांची, विशेषतः प्रकृतीची चौकशी करणारा हा मुलगा आज काहीसा वेगळाच वाटला. एकंदरीत सारंच प्रकरण गंभीर दिसतं होतं. मला उगीचच बापूने सारं धैर्य गोळा करत आवंढा गिळून सुरुवात केली असावी, असे वाटले. बापू सांगत होता. काल मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे टेकडीवर एकटाच फिरायला गेलो होतो. वास्तविक रोजच नवतरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज जागोजागी नित्याचीच होती. अर्थातच 'चालायचंच हे वयच आहे' एवढ्याच विचाराने मी निवांतपणे चालत होतो आणि अचानक थबकलो. आवाज ओळखीचा वाटला. वास्तविक मी ढुंकूनही न पहाता पुढे जाणारा, पण पाय अडखळले. आवाज नुसता ओळखीचाच नव्हता तर रोज कानावर पडणारा होता म्हणून थांबलोच. मी हाक मारली, 'दादू' पटकन नातू माझ्याजवळ आला. पाठोपाठ त्याची मैत्रीणही होती. माझी आणि नातवाची जिगरी दोस्ती आहे. निःसंकोचपणे त्यानं आपल्या मैत्रिणीची ओळख करून देत नाव, आडनाव सांगितल्यावर मी हादरलोच आणि मी त्याच्या 'आज्जा आज्जा' या हाकेकडे दुर्लक्ष करून ताडताड टेकडी उतरून घरी चालायला लागलो. खोलीचं दार आतून बंद करून बसून राहिलो. ते सकाळी तुम्हाला फोन करूनच खोलीबाहेर पडलो. माझ्यामुळं कुणीच रात्रीपण जेवलं नाही. रात्री उशिरा 'आज्जा, मी आहे' म्हणत दादूनं दार ठोठावलं. पण छातीवर दगड ठेऊन मी दार नाही उघडलं. मला आता तुम्ही सांगा आम्ही काय करावे असे म्हणत मुलीची आणि तिच्या तरंग अंतरंग / १०