पान:तरंग अंतरंग.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

__________

जिहाद एवढ्या सकाळी बाप्याचा फोन म्हणजे नक्कीच काही तरी गडबड झाली असावी. किंवा आमच्या सायंकाळच्या उरलेल्या प्रवाशातल्या कुणा सोबत्याचं स्टेशन आलं असावं! असं वाटलं. 'आप्पा, तू पाच मिनिटात येऊ शकतोस का?" हे बाप्याच बोलतोय याच्यावर विश्वासच बसेना. एरवी एवढं वय झालं तरी 'आप्प्या, आहेस का अजून का जाऊन बसलास यमाच्या मागं रेड्यावर ? रेडा खाली बसला नाय ना वजनानं तुझ्या ? हो आणि यमाला घट्ट धरून बस, मध्येच घसरलास तर शनी-मंगळ असल्या ग्रहावर पडशील!' अशी संभाषणाची सुरुवात आणि मग कानाचे पडदे फुलपाखराच्या पंखासारखे फडफडेपर्यंत हसण्याचा गडगडाट. असे नेहमीचे फोनवर बोलणे आहे. त्याचा फोन आला की कानापासून सोशल डिस्टंसिंग एवढ्या अंतरावर मी फोन धरतो. पण आजचा त्याचा सूर ऐकून मी फक्त 'निघतोच' असं म्हणालो आणि फोन ठेवला. वाटेत विचारांचे थैमान माझ्या मनात वावटळीसारखे घोंगावत होते. तसा बाप्या मस्त कलंदर माणूस. वय झालं तरी अजून उत्साह, उल्हास तरुणांना लाजवेल असा. पहाटे पाचला उठून सात-आठ किलोमीटर आपल्या काठीचा एका ठेक्यात आवाज काढत निघाला की शेजार-पाजाऱ्यांना कळायचं... पाच वाजले. अजून रोजचा घणघणीत व्यायाम, दूध-अंड्याचा नाष्टा, पुढाऱ्यांना, कलेक्टरला, मंत्र्यांना रां.. किंवा भो.....च्या पदविदानाने सन्मान बिना चष्म्याचे वर्तमानपत्राचे खणखणीत आवाजात वाचन आणि वाघाच्या डरकाळीसदृश घोरत दोन-तीन तास दुपारचीसुद्धा वामकुक्षी. हे त्याचे रुटीन. विचाराच्या तंद्रीत बाप्याच्या घराच्या गल्लीच्या तोंडावर कधी पोहोचलो कळलेच नाही. एरवी इथपर्यंत आलो की बाप्याचा गल्ली दणाणून सोडणारा आवाज कानावर येई आणि मी खिशातून दोन कापसाचे बोळे बळेच कानात ठोसत असे. आज मला मात्र सारे सामसूम होती. काही गंभीर घडले असणार अशी मनात पाल चुकचकली. निवृत्त एस.पी. असलेला आमचा मित्र मोहन चांदेकर आणि बाप्या समोरच झोपाळ्यावर बसले होते. ऐसपैस शिसवी झोपाळा, संपूर्ण चकचकीत पितळेच्या कड्या, मागे टेकायला एखाद्या सिंहासनासारखी कोरीव कामासह नक्षीदार मजबूत शिसवी टेकण. चार शुभ्र कव्हर घातलेले तक्के असा थाट होता. हातानेच थोपटून मला दोघांच्या मध्ये बसायचा इशारा मोहनने केला आणि मी पण विसावलो. बाप्या अस्वस्थ दिसला. बहुधा त्याला कुठून सुरुवात करावी कळत नसावे. म्हणून मीच म्हटलं, 'बाप्या बरा आहेस ना?' 'हो ! चार दिवस तापाने वैतागलो होतो. पण आमचे वैद्यराज रोज औषध देऊन जात होते. आणि आता मी खणखणीत आहे. ' तरंग अंतरंग / ९