पान:डी व्हँलरा.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ तह झाला पण सिंह गेला ५ डिसेंबर रोजी आयरिश रिपब्लिकन सैन्याची जमवाजमव करण्याचे डी व्हॅलेराने हुकूम सोडले. | पण दुस-याच दिवशीं प्रातःकालीं तहावर सह्या झाल्याची बातमी आली, व ती येतांच “ओहो, जिंकली !” असे आनंदोद्गार डी व्हॅलेराच्या तोंडून बाहेर पडले. आयर्लंडकडून गेलेल्या तहाच्या मसुद्यावर उभय पक्षांच्या सह्या होत नसल्या तर ब्रिटिशांचा मसुदा मान्य करण्यापूर्वी डब्लिनला पाठवावा असे आयरिश प्रतिनिधींना हुकूम होते. तसा मसुदा डब्लिनला न येतां तह झाला येवढीच बातमी आल्यामुळे डी व्हॅलेराचा साहजिकच असा तर्क झाला, की आपल्याकडून गेलेला मसुदाच इंग्लंडनें मान्य केला. या तर्कामुळेच आनंदित होऊन वर सांगितल्याप्रमाणे त्याने उद्गार काढले. पण हे त्याचे विजयोद्गार क्षणिकच ठरले, व थोड्याच वेळांत त्याच्या आनंदाला धक्का बसला. तहाची सविस्तर प्रत हातीं पडतांच त्याला स्पष्ट दिसून आले, की आयरिश प्रजासत्ताक राज्याच्या मर्मस्थानीं घाव घालणारी कलमें त्या तहांत आहेत. ते पाहतांच त्याचा पहिला हर्ष पार नाहींसा होऊन त्याच्या सर्व आशा पार विलयाला गेल्या. आयर्लंडचे खडतर नशीब अजून संपलें नाहीं अशा विचाराने त्याने एक दीर्घ श्वास सोडला, व लगेच खिन्न झालेल्या आपल्या अंतःकरणाला धीर देऊन पुढील कार्यासाठी त्याने कंबर बांधली ! लंडनला गेलेले आयरिश प्रतिनिधि परत आले. तहाला डेल आयरेनची संमति मिळाल्यावर तहाला आयर्लंड देशाची संमत मिळाली असे ठरावयाचे होते. डेलची साधारण सभा बोलावण्यापूर्वी कार्यकारी मंडळाची सभा ( Cabinet ) भरणे अवश्य होते. त्याप्रमाणे ती सभा सुरू झाली. सभेत मतभेद माजल्याच्या दाट बातम्या देशभर पसरूं लागल्या, व शेवटी त्या ख-याही ठरल्या. कारण खाली दिलेले पत्र डी व्हॅलेराच्या सहीने आयरिश वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालें.