पान:ज्योतिर्विलास.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. थोडा प्रयत्न केला तर मुंबई किंवा मद्रास यांवर अवलंबून न राहतां आपल्यास पाहिजे तेथे घड्याळ लावितां येईल. आणि ज्या त्या ठिकाणी घड्याळ लावले तरच त्यावरून योग्य वेळ कळेल. घड्याळ नव्हती तेव्हां मद्रास किंवा मुंबई यांवांचून आमचे अडत असे काय ? नाही. तसें हल्लीही अडणार नाही. आणि वस्तुतः मद्रासचा काळ आपल्या उपयोगीही नाही.. सर्व ठिकाणी सूर्योदय किंवा सूर्यास्त एकदम होते तर मद्रासची वेळ पाहिजे तेथें उपयोगी पडती. परंतु तसें होत नाही. फार तर काय, मुंबईस सूर्य मध्यान्हीं येतो त्याच्या अगोदर चार मिनिटे पुण्यास मध्यान्हीं येतो. म्हणून मुंबईच्या घड्याळाहून पुण्याचे घड्याळ चार मिनिटे पुढे पाहिजे. याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचा काळ निराळा असतो. ह्या कालास आपण निजकाल म्हणूं. हा निजकाल समजण्याची गरज वारंवार लागते. हा कसा समजावा, म्हणजे घड्याळ कसे लावावें, याचा थोडासा विचार करूं. घड्याळांविषयी गैरमाहित अशा लोकांची समजूत अशी असते की, सूर्योदयाबरोबर घड्याळांत नेहमी सहा वाजतात. परंतु हीत तर फारच चूक आहे. तसेच दोन प्रहरी घड्याळांत बरोबर १२ वाजतात, असाही कित्येकांचा समज असतो. आणि ह्याच धोरणाने ते घड्याळ लावितात. यांतही दोन प्रकारांनी चुकी होण्याचा संभव असतो. बरोबर दोन प्रहर नुसत्या डोळ्यांनी समजणे कठिण, आणि बरोबर दोन प्रहरी नेहमी बारा वाजतात असे नाही. दोन प्रहरी, म्हणजे याम्योत्तरी सूर्य येतो तेव्हां, कधी बारा वाजण्यास १५ मिनिटें अवकाश असतो; आणि कधी सवाबाराही होतात. असे होण्याचे कारण, सूर्याची गति नियमित नाही, हे होय. क्रांतिवृत्तांत त्याची गति कधी ६७ कला असते, कधी ६१ कला असते. यामुळे एकदां सूर्य मध्यान्हीं आल्यापासून पुन्हां मध्यान्हीं येण्यास कधी २४ तासांहून ३० सेकंदपर्यंत जास्त लागतात, कधी ३० सेकंद कमी लागतात. सूर्योदय किंवा अस्त यांत तर याहूनही कमजास्त फरक पडतो. यामुळे एकदां सूर्य मध्यान्हीं आला तेव्हां घड्याळांत १२ वाजवून ठेविले असतां कांही दिवसांनी सूर्य मध्यान्हीं येईल तेव्हां बारांहून कमजास्त वाजतील. आमचे वाचक म्हणतील की, खासे काम. मद्रासेकडे पहात न बसतां आम्हांस स्वतः सूर्यावरून घड्याळ लावण्यास सांगतां, आणि सूर्याची तर ही अवस्था. वाचकहो, यास उपाय आहेत. सूर्याची गति अनियमित आहे, तरी तीस कांहीं नियम आहेत. व ती बरोबर काढिता येते, आणि सूर्याची गति अनियमित असली तरी त्यास कधी किल्ली द्यावयास नको; व त्याची गति कधी बंद पडावयाची नाही. सूर्य एकदां मध्यान्हीं आल्यापासून पुन्हा येईपर्यंत जो काळ जातो त्यास सावनदिवस म्हणतात. सावन दिवसाचें मान कमजास्त होते. म्हणून सगळ्या सावन दिवसांची सरासरी काढून त्याचे मध्यम मान ठरविले आहे. हा परिमित मध्यमकाल पाहिजे त्या परिमाणांनी सांगता येईल. आपले लोक ह्या कालाच्या