पान:ज्योतिर्विलास.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ज्योतिर्विलास.


कडा घेतला आणि तितकेंच पाणी घेतले तर त्या पाण्याचे जितकें वजन भरेल त्या सुमारे ३॥ पट वजन त्या तुकड्याचें भरेल. हे चंद्राचे विशिष्टगुरुत्व होय.

 आपण कोणताही गोल पाहिला असतां त्याचा अर्धा भाग मात्र आपल्यास दिसतो. त्या प्रमाणे सूर्यास चंद्राचे अर्ध मात्र दिसते. जे अर्ध दिसते त्यावर प्रकाश असतो. आणि त्यापैकी जितका भाग आपल्याकडे असेल तितका आपल्यास प्रकाशित दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरता फिरतां एकदां पृथ्वी आणि यांच्या मध्ये असतो, तेव्हा त्याचे प्रकाशित अर्ध सगळे सूर्याकडे असते. या वेळी अमावास्या होते. पुढे चंद्र पूर्वेकडे जात चालला म्हणजे त्याचा अधिकाधिक प्रकाशित भाग आपल्याकडे होतो. पूर्णिमेच्या रात्री तो व सूर्य यांच्या मध्ये आपण असतो, म्हणून त्यांचा सगळा प्रकाशित भाग आपलेकडे असतो. यामूळे चंद्र आपल्यास पूर्ण दिसतो. पुढे तो आणखी पूर्वेस जातो तसतसे त्याचे बिंब पश्चिमेकडून क्रमाने अधिकाधिक अप्रकाशित दिसू लागते. या प्रमाणे त्याच्या कला जास्तीकमी होतात.

 अमावास्येच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी चंद्रदर्शन होते. तेंव्हा त्याची अगदी बारीक कोर दिसत असते. तिच्या टोकांची त्या वेळी फार मौज दिसते. त्या टोंकांस शृंगें म्हणतात. अमुकं शृंग उंच दिसले म्हणजे महर्घता किंवा स्वस्तता होईल वगैरे समजुती आहेत. कोणते टोंक उंच दिसावें हें आपल्यास सहज समजेल. चंद्राच्या ज्या अंगास सूर्य असतो तें अंग प्रकाशित अर्थात् त्याच्या उलट बाजूस शृंगें असतात. चंद्रदर्शनाच्या दिवशी सूर्य जेथे मावळतो, त्याच्या वर अगदी समोरच चंद्र असला तर दोन्ही शृंगें सारखी दिसतात. सूर्याच्या उत्तरेस चंद्र असला तर दक्षिणचे टोंक उंच दिसेल, उत्तरेच्या खाली दिसेल. या प्रमाणे दक्षिणेस चंद्र असला तर दक्षिण टोंक खाली, उत्तरेच्या उंच दिसेल. इंग्लंद वगैरे देशांत कधी चंद्र इतका बाजूस उगवतो की एका शृंगाच्या अगदी समोर वर दुसरे शृंग दिसते. वद्य त्रयोदशी चतुर्दशीच्या सुमारास चंद्र पहाटेस सूर्योदयापूर्वी दिसतो, तेव्हाही असेच होते. सूर्य असेल तिकडचा भाग प्रकाशित दिसून त्याच्या उलट बाजूस शृंगे दिसतात

 चंद्राच्या कला वाढू लागल्यापासून सुमारे १५ दिवसांनी तो पूर्ण होतो. चंद्र एकदां पूर्ण झाल्यापासून पुन्हा होईपर्यंत किंवा एका रात्री मुळीच न दिसल्यापासून पुन्हा दिसेनासा होईपर्यंत सुमारे ३० दिवस जातात. इतक्या काळास चांद्रमास म्हणतात.* कारण तो चंद्राच्या योगानें समजतो. दिवस समजण्याचे स्वाभाविक साधन जसें सूर्योदय, तसें चंद्राचे पूर्ण होणे किंवा अगदी न दिसणे हे चांद्रमास समजण्यास स्वाभाविक साधन आहे. या मुळे जगांत हा मास प्रचारांत आला असला पाहिजे. इतर प्रकारचे मास मागाहून प्रचारांत

-----

 * एकदा पूर्णिमा किंवा अमावास्या झाल्या पासून पुढे ५९ दिवसांत दोन पूर्णिमा अमावास्या होतात. म्हणजे चांद्रमासाचें मान सुमारे २९॥ दिवस आहे.