पान:ज्योतिर्विलास.pdf/६९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
आकाशस्थ ज्योतींविषयी लोक काय म्हणत आले ?


असें नांव देऊ. अप्रवाही किंवा प्रवाही स्वयंप्रकाश पदार्थांचे किरण कांचपरशूवर पाडिले असता त्यांपासून अनुक्रमें तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, अस्मानी, निळा आणि जांभळा अशा सात रंगांचा वर्णलेख निघतो. दुर्बिणीत कांचपरशूची योजना करून खस्थ पदार्थाचे वर्णलेख कागदावर घेतात. असे वर्णलेख घेण्याच्या यंत्रास वर्णलेखक म्हणतात. एकाद्या ज्वलद्वायूचा वर्णलेख घेतला तर त्यांत कांहीं कांहीं वर्णांच्याच चकचकीत रेषा किंवा पट्टे निघतात. अमुक वायूच्या वर्णलेखांत अमुक रंगांच्या रेषा अमक्या क्रमाने उठतात असा नियम आहे. काहीमध्ये एकदोन रेषा असतात, व कांहीत पुष्कळ असतात. आणखी असे की प्रवाही किंवा प्रवाही स्वयंप्रकाशपदार्थाचे किरण वायुरूप वेष्टनांतून बाहेर येत असले तर त्या स्वयंप्रकाशपदार्थाच्या वर्णलेखांत सात रंग असतात, परंतु त्यांवर ज्या आडव्या काळ्या रेषा उमटतात त्या अमुक वायुवेष्टनाच्या अमुक क्रमाने उमटतात असा नियम दिसून येतो. व त्या नुसत्या वायूचा स्वतंत्र वर्णलेख घेतला त्यांत जितक्या चकचकीत रेषा ज्या क्रमाने असतात, तितक्याच काळ्या रेषा क्रमाने त्या वायूच्या वेष्टनांत असलेल्या स्वयंप्रकाशपदार्थाच्या वर्णलेखांत उठतात. पृथ्वीवरील निरनिराळे वायु, धातु, इत्यादिकांचे वर्णलेख निरनिराळ्या स्थितीत कसे निघतात, तसेच परावर्तन पावलेल्या प्रकाशाचे वर्णलेख कसे निघतात, याचा अनुभव घेतला आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारा यांची घटकद्रव्ये अमुक आहेत एकंदरीत त्यांची शारीरस्थिति कशी आहे हे जाणण्यास हे वर्णलेखकयंत मोठे साधन झाले आहे. पदार्थ जवळ असो किंवा कितीही दूर असो त्याचा वर्णलेख सारखाच निघतो. यामुळे नुसत्या दुर्बिणीचा जेथें कांहीं इलाज चालत नाही, तेथे ह्या यंत्राने अद्भुत शोध लागत चालले आहेत. आपल्या सरकाराने पुणे येथील सायन्स कालेजांत इसवी सन १८८८ मध्ये एका वर्णलेखक यंत्राची योजना केली आहे. व त्यांतून वेध घेण्याकरितां एक कामदार नेमिला आहे. ह्या यंत्रांतील दुर्बीण परावर्तक आहे. तिला १००० पौंड पडले. तीतल्या मुख्य भिंगाचा व्यास १६।। इच आहे. व तीतन पदार्थ पाहिला असतां मूळच्या १२०० पट दिसतो.

 सारांश गेल्या तीन शतकांत ज्योतिषशास्त्राचे विलक्षण स्थित्यंतर झाले आहे. सूर्यमालेतील ग्रहांची सापेक्ष अंतरें नव्हत, तर प्रत्यक्ष अंतरें व आकार सांप्रत कळले आहेत. इतकंच नाही तर त्या सूर्यादिक ज्योतीस शास्त्ररूप तराजूत घालून प्रत्यक्ष वजनेंही ज्योतिष्यांनी काढिली आहेत. फार काय सांगावें, सूर्य आणि त्याच्यापेक्षा लक्षावधिपट दूर असणाऱ्या तारा यांची शारीरस्थिति कशी आहे, पृष्ठावरील कोणते वायु इत्यादि पदार्थ त्यांवर आहेत, हे येथे बसून समजू लागले आणि त्याबरोबरच मनुष्याची शक्ति किती अत्यल्प आहे, हेही समजू लागले आहे. या सर्व गोष्टींचे वर्णन आतां क्रमाक्रमाने येईल

----------------