पान:ज्योतिर्विलास.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
ज्योतिर्विलास.


रजनीवल्लभ.
---------------
अंक १.
मलिनमपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मी तनोति ।
किमिव हि मधुराणां मंडनं नाकृतीनां ॥
(शशिमाजी लांछनाची बहु शोभा दीसते ।
जातीच्या सुंदरांना काहीही चालतें ॥)
        शाकुंतल, १-१८.

 आकाशस्थ सर्व तेजांमध्ये चंद्रा सारखे मनाचे आकर्षण करणारे दुसरे नाही. कालिदासाने म्हटल्या प्रमाणे त्याला शोभाच देणारे त्याचे लांच्छन, सौम्य आणि शीतल चंद्रिका, २७ नक्षत्रांमधून त्याची शीघ्र गति व कांहीं तारांचा त्याचा अतिनिकट समागम, त्याच्या बिंबाची क्षयवृद्धि, एका रात्री त्याचे अदर्शन आणि एका रात्री पूर्णतेजाने रात्रभर दिसणे, ह्या गोष्टींनी अनेक कल्पना रंग उद्भवले आहेत; विलक्षण समजुती पडल्या आहेत; नानाप्रकारच्या कथा रचल्या आहेत; कालगणनेचे साधनही ह्या गोष्टीत आहे; आणि ज्योति:शास्त्राकडे मनुष्य ची प्रवृत्ति होण्यास ह्याच गोष्टी कारण झाल्या आहेत. सारांश ह्या गोष्टीपासून मनोरंजक आणि उपयुक्त असे अनेक परिणाम झाले आहेत.

 सर्व नक्षत्रांतून चंद्राची एक प्रदक्षिणा होण्यास मध्यम मानाने सुमारें २७ दिवस १९ घटिका लागतात. कधी यांहून कांहीं घटिका कमी लागतात, कधी जास्त लागतात. अशा कमजास्त मानांच्या सरासरीने काढिलेलें जें मान त्याला ज्योतिःशास्त्रांत मध्यम म्हणतात. एका तारेजवळ एकदां चंद्र दिसला तर पुन्हा वर लिहिलेल्या काळाने तो तेथे येईल. या काळास नाक्षत्रमास म्हणतात. नक्षत्रातून कांहींच्या दक्षिणेकडून नेहमी चंद्र जातो; कांहींच्या उत्तरेकडून जातो. बाकी कृत्तिका रोहिणी, पुष्य, मघा, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वापाढा, उत्तराषाढा, शतभिषक्, रेवती यांचे तो कधीकधी आच्छादन करितो, सांगितलेच आहे ह्या आच्छादनास पिधान असे म्हणतात. कृत्तिका इत्यादी नक्षत्रांच्या ज्या तारा बारीक आहेत त्यांचे पिधान चंद्र करीत असला तरी तो त्याजवळ येण्यापूर्वीच पांचसात अंशांवर आहे तोच त्या तारा नुसत्या दिसतनाशा होतात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीच्या ताराही चंद्र एकदोन अंशावर आहे तोंच दिसतनाशा होतात. मघा, ज्येष्ठा, चित्रा, रोहिणी, ह्या पहिल्या प्रतीच्या तारा मात्र चंद्र अगदी जवळ येई पर्यंत दिसत असतात.