पान:ज्योतिर्विलास.pdf/६८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
ज्योतिर्विलास.


हजारों जीवांस आश्रय देणारा अति भव्य वटवृक्ष यांची उपमा शोभेल. आमचे आहे ते आहे.

 सोळाव्या शतकाच्या अखेरीच्या सुमारास दुर्बिणीची युक्ती हालंड देशात निघाली. ज्योतिषशास्त्राच्या शोधाकडे प्रथम दुर्बिणीचा उपयोग केल्याचा मान गॅलिलियो ह्यास आहे. त्याने स्वतः दुर्बीण केली. आणि तिच्या साह्याने सर्वप्रथम इ० स० १६१० मध्ये गुरूचे उपग्रह पाहिले. ज्योतींचे अवलोकन डोळ्यांनी करावयाचे, ते डोळे जितके तीव्र आणि निर्दोष असतील तितके चांगले. अतर्क्य भावाचा दुर्बीण हा एक नवा डोळाच ज्योतिष्यांस मिळाला. तो अडीच लक्ष अंतरावरचा पदार्थ चाळीस मैलांवर आणून दाखवू लागला. अर्थातच या नवीन डोळ्याने नवीन शोध झपाट्याने होऊ लागले. वक्रीकार दुर्बीण आणि परावर्तक दुर्बीण अशा २ प्रकारच्या दुर्बिणी असतात. एकीत उभयतोगोल कांचेतून पदार्थ किरणांचे वक्रीभवन होऊन पदार्थाची प्रतिमा उठते. आणि दुसरीत अंतर्गोल भिंगापासून पदार्थकिरणांचे परावर्तन होऊन प्रतिमा तयार होते. प्रत्येक प्रकारच्या दुर्बिणीत काही सोई व कांहीं गैर सोई आहेत. परावर्तक दुर्बिणीतले मुख्य भिंग पुष्कळ मोठे करितां येते. परंतु तिच्यापेक्षां वक्रीकार दुर्बीण वापरण्यास फार सोयीची असते. आजपर्यंत महत्त्वाचे बहुतेक शोध वक्रीकार दुर्बिणीनेच झाले. पृथ्वीवर सर्वांत मोठी वक्रीकार दुर्बीण हल्ली अमेरिकेंत कालिफोर्निया प्रांतांत टहामिलटनच्या वेधशाळेत आहे. तिचे मुख्य भिंग ३६ इंच व्यासाचे आहे. सर्वात मोठी परावर्तक दुर्बीण ऐरलंदांत लार्ड रास याची आहे. तिचे तोंडाकडचे भिंग ६ फूट व्यासाचे आहे.

 इसवी सन १८३० च्या सुमारास प्रकाशलेखनकला दुर्बिणीच्या सहाय्यास आली. चंद्रादिकांच्या पृष्ठभागाचे चित्रपट हाताने काढण्यास १७ व्या शतकात सुरुवात झाली होती. परंतु मानवी चितारी किती कुशल झाला तरी सूर्यकिरणापुढे त्याचा काय पाड ? सूर्यचंद्रादि तेजें स्वतः आपली चित्रे काढून देऊ लागली. पांच सेकंदपर्यंत त्यांस कोंडून धरिलें की चित्र तयार! यायोगें आकाशस्थ ज्योतीचे स्वरूप समजण्यास उत्कृष्ट साधन झाले.

 वर्णलेखक म्हणून आणखी एक यंत्र या शतकांत निघाले आहे. आकाशातील ज्योति पहाण्याकडे ह्याचा उपयोग सुमारें इ० सन १८६० पासून होऊ लागला. इतक्या थोडक्या काळांत त्याच्या योगाने महत्त्वाचे शोध झाले. कांचपरशु* हंडीचा एकादा लोलक ) सूर्यकिरणांत धरिला असतां किरणांचे पृथक्करण होऊन निरनिराळ्या सात रंगांचे किरण पडतात, हे पुष्कळांनी पाहिले असेल. काही विशेष योजनेने या रंगांच्या प्रकाशाचा जो एक पट्टा दिसतो, त्यास आपण

-----

 * इंग्रजीतील प्रिझम (prism ) या शब्दास संस्कृत शब्द 'चिति' असा आहे. दर्शनानुशासन शास्त्रांत ज्या प्रिझमाचे नेहमीं कारण पडतें तो बहुधा पाचरेच्या आकाराचा त्रिकोण असतो. म्हणून येथे 'प्रिझम' यास 'परशु' अशी संज्ञा दिली आहे.