पान:ज्योतिर्विलास.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
ज्योतिर्विलास.

रत असत असतां त्यांचा मंदकर्ण म्हणजे ग्रह आणि सूर्य यांस सांधणारी रेषा समान कालांत समान क्षेत्रे आक्रमिते. म्हणजे असे की ग्रहकक्षा दीर्घवतुल असल्यामुळे मंदकर्ण कमजास्त होतो, तरी कोणतेही दोन अवधि घेतले तर त्यात मंदकर्णानें क्रमिलेली दोन क्षेत्रे सारखी असतात. क्षेत्राची लांबी कमी झाली तर रुंदी वाढते. (३) सूर्यापासून ग्रहांच्या मध्यम अंतरांचा घन आणि प्रदक्षिणाकालाचा वर्ग हे प्रमाणांत असतात. उदाहरण सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १ मानले तर मंगळाचे अंतर १.५२४ आहे. ह्यांचे घन अनुक्रमे १ आणि ३.५४ होत पृथ्वीस सूर्याभोवती फिरण्यास १ वर्ष लागते. मंगळास १.८८१ वर्षे लागतात यांचे वर्ग १ आणि ३.५४ हे आहेत. ह्यांत अंतराचे घन प्रदक्षिणाकालाच्या वर्गीबरोबर आहेत.

 हे तीन नियम दिसण्यांत फार साधे दिसतात. परंतु हे स्थापित करण्यास केप्लरला २२ वर्षे घालवावी लागली. त्यांतही त्याच्या वेळी लाग्रथमाचे गणित नव्हते, यामुळे गणित करण्यास त्यास फारच श्रम पडले. पहिला नियम त्याने इ. सन १६१९ मध्ये प्रसिद्ध केले. व तिसरा नियम आण,खी ९ वर्षांनी त्यास समजला. तेव्हां त्यास अत्यंत आनंद आणि समाधान होऊन परमेश्वराने आपल्या कृतीचें आज स्पष्टीकरण केले " अशा अर्थाचा उद्गार त्याने आपल्या पुस्तकांत काढिला आहे.

 पुढे दुर्बिणयंत्राची कल्पना निघून पूर्वीच्याहून फार सूक्ष्म वेध होऊ तेव्हां केप्लरच्या नियमांप्रमाणे सर्वांशी ग्रहगति प्रत्ययास येत नाही, थोडा फेर होतो, असे दिसू लागले. शिवाय केप्लरच्या नियमांचे तरी कारण काय अशी जिज्ञासा होतीच. ह्युजेन्स नामक एक शोधक झाला, त्याने मध्योत्सारिणी नियम शोधून काढिला होता. परंतु इतकी सिद्धता झाल्यावर विश्वरचनेचे व्यापक कारण दुसऱ्या एका अलौकिक पुरुषाने काढावे असा ईश्वरी संकेत काढावे असा ईश्वरी संकेत होता. असा पुरुष न्यूटन हा झाला.

 न्यूटनाने पदार्थाच्या गतीचे तीन नियम काढिले ते असे:-(१)पदार्थाला एकदां गति प्राप्त झाली आणि त्यावर दुसरी एकादी प्रेरणा लागू झाली नाही, तो पदार्थ पहिल्या वेगाने सतत सरळ रेषेत चालत असतो. (२) गतिमान पदार्थावर दुसरी प्रेरणा लागू झाली तर त्या प्रेरणेच्या वेगाप्रमाणे व तिच्या दिशेने पदार्थ चालू लागतो. (३) आघात आणि प्रत्याघात समान असतात. परंतू परस्परविरुद्ध दिशेने होतात.

 हे नियम न्यूटनच्या पूर्वी कोणाच्या लक्षात न येण्याचे मुख्य कारण पृथ्वीच्या आकर्षणामुळे पृथ्वीवर कोणताच पदार्थ सतत गतिमान् दिसत नाही हेच होय. न्यूटनची अलौककबुद्धि या प्रतिबंधांतून पलीकडे जाऊन तिने पृथ्वीवर दिसून येणारे आकर्षण विश्वास लागू केले.