पान:ज्योतिर्विलास.pdf/५१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


देवांची मंदिरें.    ३५

अध्यान्हीं येतात. चंद्राचा समागम पुष्य आणि आश्लेषा ह्यांशी थोड्याच काला च्या अंतराने होतो.

 मघांच्या तारा कोणी ५ व कोणी ६ मानितात. मघापंचक विशेष प्रसिद्ध आहे. पांचांपैकी ४ तारा ठळक आहेत. त्यांचा एक समांतरभुजचौकोन बनतो. तो समभुजचौकोन म्हटला तरी चालेल. त्यांतल्या पश्चिमेकडील बाजूच्या दक्षिण टोकांतली तारा सर्वात तेजस्वी आहे. ती पहिल्या प्रतीची आहे. तिच्या दक्षिणेस एक बारीक तारा आहे, ती पांचवी तारा होय. पूर्वबाजूच्या दोहोंत दक्षिणेची अधिक तेजस्वी आहे. मे महिन्याच्या आरंभी मघा आवशीस खस्वस्तिकाच्या कांही दक्षिणेस दिसतात.

 मघांच्या पूर्वेस पूर्वोत्तरफल्गुनींच्या ४ तारांचा एक चांगला काटकोनचौकोन होतो. त्याची पूर्वपश्चिम बाजू उत्तरदक्षिण बाजूच्या दुपटीहून कांहीं कमी आहे पश्चिमेकडील दोन तारा त्या पूर्वाफल्गुनी. त्यांत उत्तरेकडची अधिक तेजस्वी आहे. पूर्व बाजूच्या दोन त्या उत्तराफल्गुनी. त्यांतली दक्षिणची ठळक उत्तरेची बारीक आहे. ज्या चांद्रमासांत फल्गुनी नक्षत्री चंद्र पूर्ण होतो तो फाल्गुन होय. वेदादिकांत उत्तराफल्गुनींची देवता भग आहे. बारा सूर्यात एकाचें नांव भग आहे. सांप्रतच्या शिमगामाहात्म्याचे मूळ ह्या शब्दांत दिसतें. फाल्गुनांत ही दोन नक्षत्रे आवशीस उगवतात. मेजूनमध्ये आवशीस मध्यान्ही येतात तेव्हां खस्वस्तिकाच्या जवळच दिसतात.

 हस्तांच्या पुढे चित्रा, स्वाती ह्या तारा इतक्या ठळक आहेत की त्या सहज लक्षांत येतात. दोन्ही पहिल्या प्रतीच्या आहेत. हस्तांच्या पूर्व बाजूस काहीशा ईशान्येस चित्रा तारा आहे. तिच्या पुष्कळ उत्तरेस स्वाती तारा आहे.चित्रा तारेहून स्वाती जास्त तेजस्वी आहे. चित्रास्वाती बहुधा बरोबरच उगवतात. स्वाती तारा चित्रा तारेच्या मागाहून ५० मिनिटांनी मध्यान्हीं येते, आणि तिच्या नंतर सुमारे १।। तासाने मावळते. जूनच्या उत्तरार्धात चित्रा, व जुलाई स्वाती आवशीस मध्यान्हीं येतात. तेव्हां चित्रा सुमारे ३० अंश दक्षिणेस असते; स्वाती खस्वस्तिकाच्या जवळच असते. हस्त आणि चित्रा ह्यांच्या प्राचीन ग्रंथांत वर्णिलेल्या आप आणि अपांवत्स ह्या दोन तारा असून त्या तिसऱ्या आणि चवथ्या प्रतीच्या आहेत.

 पाश्चाल्य ज्योतिष्यांनी आकाशांतील तारकांचे सुमारे १०९ राशि म्हणजे कल्पिले आहेत. त्यांपैकी ४८ प्राचीन आहेत. बाकीचे गेल्या तीनशे वर्षात कल्पिले आहेत. अठेचाळिसांमध्येच क्रांतिप्रदेशांतले मेषादि १२ राशि येतात.२७ नक्षत्रांचे पुंज १२ राशीत येतात. त्यांस पाश्चात्यांची निराळी नांवें नाहींत. क्रांतिप्रदेशांतले बारा राशि आणि दुसरे सहा सात राशि ह्यांतल्या बहुतेक तारा आणि बाकीच्या राशीतल्या बहुतेक पहिल्या प्रतीच्या तारा आमच्या प्राचीन ग्रंथांत आहेत. पाश्चात्यांनी कल्पिलेल्या बाकीच्या राशीस संस्कृत संज्ञा कैलासवासी बाळ-