पान:ज्योतिर्विलास.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३४    ज्योतिर्विलास.

ब्रूक इत्यादिकांनी मानिली आहे. कैलासवासी केरोपंतनाना यांनी योगतारांचा मात्र निर्णय केलेला दिसतो. तो बहुधा बेंटलीस अनुसरून आहे. त्यांत आर्द्राची तारा दुसरीच आहे. ती फार बारीक आहे. चंद्र आपल्या मार्गक्रमणांत या दोहोंच्याही जवळ येत नाही. पहिलीपासून तर फारच लांब राहतो. मी जी मानिली आहे ती मानणें सांप्रतच्या स्थितीत अवश्यक आहे, व ती मानण्यास माझ्या मते वेदाचाही आधार आहे. ती चांगली ठळक आहे; चंद्र तिच्या फार जवळ येतो; व ती मृग आणि पुनर्वसू ह्यांच्या मध्ये आहे.

 पुनर्वसूच्या तारा कोणी दोन व कोणी चार मानितात. दोन मानिल्या तर नकाशांत ज्या १, २ ह्या अंकांनी दाखविल्या आहेत त्या घ्यावयाच्या. त्यांत अंक दोनची पहिल्या प्रतीची आहे. युरोपियन लोकांचे क्यास्टर आणि पोलक्स हेच होत. दोहोंपैकी विशेष चकचकीत तो पोलक्स, आणि दुसरा उत्तरेकडचा तो क्यास्टर. जे चार तारा मानितात, ते अंक ३, ४ ह्या पुनर्वसूंत मानितात. त्यांत अंक ४ ही पहिल्या प्रतीची आहे. वेदांत दोनच पुनर्वसू वर्णिले आहेत. दोन पुनर्वसूची उपमा काव्यादिकांत पुष्कळ ठिकाणी येते.

   गां गताविव दिवः पुनर्वसू
     रघुवंश सर्ग ११ श्लोक ३६.

 ही रामलक्ष्मणांस कालिदासाने दिलेली पुनर्वसूची उपमा पुष्कळांनी वाचली असेल.." चंद्राच्या पार्श्वभागीं पुनर्वसु शोभतात, तसे धर्मराजाच्या रथाच्या समीप ते दोघे [चक्ररक्षक पांचालवीर ] शोभले " हे महाभारतांतलें* वर्णन तर अगदी वस्तुस्थितिदर्शक आहे. 'पुनर्वसू समीप चंद्र येतो तेव्हां त्याची क्रांति कधी थोडी असते, कधी फार असते. फार असते तेव्हां तो दोन पुनर्वसूंच्या अगदी जवळ येतो.

 कोणी पुनर्वसूंच्या चार तारा मानितात, त्यांतल्या उत्तरेकडच्या दोन दक्षिणेकडील दोहोंच्या अगोदर उगवतात; आणि मागाहून मावळतात. असे का हे सकृद्दर्शनी गूढ पडते.

 पुष्यांच्या तीन बारीक तारांचा एक लहानसा त्रिकोण होतो. त्याचा शिरःकोण पश्चिमेस आहे. वस्तुतः तेथे बारीक दोन तीन तारा आहेत. सामान्य दृष्टीस त्या मिळून एक तारा दिसते. अप्रिल महिन्यांत पुष्य आवशीस मध्यान्ह येतात. त्या वेळेस ते खस्वस्तिकांतच असतात म्हटले तरी चालेल. रामायण महाभारत यांत गुरुपुष्ययोगाचे आणि नुसत्या पुष्याचेही फार माहात्म्य आहे. पुष्कळ कृत्यांस तो शुभमुहर्त मानिलेला आहे. काही ग्रंथांत पुष्याची एकच तारा सांगितली आहे.

 आश्लेषाच्या तारा कांहीं ग्रंथांत ५ व कांहीत ६ आहेत. आश्रेषापंचक विशेष प्रसिद्ध आहे. ह्या तारा पुष्यांच्या दक्षिणेस आहेत, व बहुधा त्यांबरोबरा-

-----

 * कर्णपर्व, अध्याय ४९ श्लोक २८.