पान:ज्योतिर्विलास.pdf/३५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिव्य भ्रमण.    १९

अंगास सप्तर्षि आहेत. ते सातही बहुधा दुसऱ्या प्रतीचे आहेत. उत्तर आणि पूर्व यांच्या अर्ध्या भागाच्या सुमारास ते आहेत. त्यांची आकृति मनांत धरून आकाशांत त्याच बाजू स पहा. म्हणजे सप्तर्षीची ओळख पटल्यावांचून राहणार नाही. एकीसारख्या एक तेजस्वी अशा सात तारा एका ठिकाणी आकाशाच्या त्या भागी दुसऱ्या नाहीतच. त्यांत डाव्या बाजूस चार तारांचा एक चौकोन झाला आहे, व उजव्या बाजूस तीन तारा आहेत. किंवा उजव्या बाजूस अर्धवर्तुलाकारांत पांच तारा आहेत. त्या वर्तुलाचा बांक खालच्या बाजूस आहे. डाव्या बाजूस बाकीच्या दोन तारा आहेत. सातांमध्ये उजव्या अंगून दुसरी तारा दिसते, तो वसिष्ठ होय. त्याच्या अगदी जवळ खालच्या बाजूस किंचित् उजव्या अंगास बारीक तारा दिसते, ती अरुंधती होय. दृष्टि सूक्ष्म नसली तर ती दिसणार नाही. न दिसली तरी फिकीर करूं नका. अरुंधती सुमारे पांचव्या प्रतीची आहे. दृष्टि सूक्ष्म असल्यास अभ्यासाने हिच्यापेक्षाही सूक्ष्म तारा दिसतात. ह्याच रात्री अकरा वाजतां पहाल तर सप्तर्षि मध्यान्हीं आलेले दिसतील. मे महिन्याच्या आरंभी नऊ वाजतां व जूनच्या आरंभी सात वाजता ते माध्यान्ही दिसतील. मार्चपासून सात महिने ते अवशीस दिसतात. त्यांत मार्चमध्ये सात वाजतां नुकते उगवलेले असतात; सप्तंबरांत मावळावयास गेले असतात. सप्तर्षीमध्ये डाव्या अंगास जे दोन आहेत, त्यांत वरचा पुलह आणि खालचा त्याच्या उत्तरचा ऋतु होय. ह्या दोहोंस सांधणारी एक रेषा काढून ती खालच्या बाजूस म्हणजे ऋतूच्या अंगास आणखी पांचपट वाढविली तर ध्रुवास जाऊन मिळते. ध्रुव तारा सुमारे दुसऱ्या प्रतीची आहे. परिशिष्ट एक ह्यांत तारांच्या प्रती दिल्या आहेत. ध्रुवाच्या आसपास सुमारे पंधरा अंशांत इतकी तेजस्वी दुसरी तारा नाही. एकदां ध्रुव पाहिल्यावर दोन तीन तासांनी पुन्हा पहावा. त्या वेळी सप्तर्षीं बरेच सरकले असे दिसेल; परंतु ध्रुव पहिल्या जागेवरून चळलेला दिसायाचा नाही. व यावरून ध्रुवाची ओळख सहज होईल. पुलह आणि ऋतु यांस सांधणारी रेषा खाली वाढविली असतां तींत ध्रुव येतो, म्हणून त्या दोन तारांस ध्रुवदर्शक म्हणतात.

 मार्चपासून सात महिन्यांत सप्तर्षि आणि ध्रुव ह्यांची पहिली ओळख आवशीस करून घेता येते. फ़ेब्रूआरीच्या आरंभी देखील रात्री नऊ वाजतां व जानआरीमध्ये अकरा वाजतां सप्तर्षि नुकते उगवलेले असतात. परंतु ते मध्यान्हीं आलेले पहाणे जास्त सोयीचे असते. जानुआरीच्या आरंभी पहाटेस पांच वाजतां व फेब्रुआरीच्या आरंभी पहाटेस तीन वाजतां ते मध्यान्हीं दिसतात. बाकीच्या तीन महिन्यांत त्यांची ओळख करून घेणे असेल तर पहाटेस उठण्याची तसदी घेतली पाहिजे. ऑक्टोबरात पहाटेस पांच वाजतां ते नुकतेच उगवलेले असतात; नवंबरांत त्यावेळी बरेच वर आलेले दिसतात; आणि दिसेंबरांत तर त्याहून वर दिसतात; त्यांत ध्रुवदर्शक २ ऋषि तर मध्यान्हाच्या अगदी जवळ आलेले असतात.