पान:ज्योतिर्विलास.pdf/३६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


२०    ज्योतिर्विलास.

 ह्या पुस्तकाचा उपयोग ज्या प्रदेशांत होण्याचा संभव आहे, त्याचा मध्य २० अक्षांशांवर होतो असे समजून तेथें जशी तारांची स्थिति दिसेल तशी नक्षत्रपटात दाखविली आहे. नाशिकचे अक्षांश २० आहेत. तेथें नकाशाप्रमाणे स्थिति दिसेल. जसजसे दक्षिणेस किंवा उत्तरेस जावें तसा किंचित् फरक पडेल. धारवाडचे अक्षांश सुमारे १५/ आहेत. तेथें नकाशाच्या दक्षिण मर्यादेच्या पलीकडील ४ / अंशांतल्या तारा दिसतील. त्या अर्थातच नकाशांत दाखविलेल्या नाहीत. नकाशांतील उत्तरेकडील ४/ अंशांतल्या तारा धारवाडास दिसणार नाहीत. ग्वाल्हेरचे अक्षांश सुमारे २६ आहेत. तेथें नकाशांत दक्षिणेकडील अंशांतल्या तारा दिसणार नाहीत. उत्तरेकडे ६ अंशांतल्या जास्त दिसतील. नकाशाच्या मध्यबिंदूपासून कडेपर्यंत म्हणजे खस्वस्तिकापासून क्षितिजापर्यंत ९० अंश होतात. यावरून ६ अंश म्हणजे किती थोडी जागा आहे हे दिसून येईल. तिन्ही नकाशांत उत्तरबिंदूपासून २० अंशांवर ध्रुव आहे. आपले ठिकाणापासून जसजसे उत्तरेस किंवा दक्षिणेस जावे, तसतसा तो वर किंवा खाली दिसेल. जागेचे जितके अक्षांश तितकी तेथें ध्रुवाची उंची दिसते.

 आतां आपण कधीही न मावळणाऱ्या तारा पाहूं. ध्रुवाची पक्की ओळख होईपर्यंत सप्तर्षि आकाशांत नसतील तेव्हां ध्रुव लवकर लक्षात येत नाही. तो येण्यासही ह्या तारा उपयोगी आहेत. तिन्ही नक्षत्रपटांत ध्रुवाजवळ ध्रुवमत्स्य नांवाचा तारकापुंज आहे. त्यांत सात तारा आहेत. ध्रुव हे माशाच्या शेपटाचे टोक आहे. आणि २ तारांनी मत्स्याचे पसरट तोंड झाले आहे. ह्या दोन तारा मत्स्याचे पुच्छ आणि सप्तर्षि ह्यांच्या मध्याच्या सुमारास आहेत. त्यांतली एक तारा ध्रुवाइतकी तेजस्वी आहे. दुसरी अंमळ कमी आहे. तिच्याहून बाकीच्या बारीक आहेत. ह्यांच्या आसपास आणखी बारीक तारा आहेत, परंतु त्या मत्स्याकृतींत येत नाहीत. काळोख्या रात्री हा मत्स्य सामान्य नेत्रांसही उत्कृष्ट दिसतो. आणि एकदां त्याची ओळख पटली म्हणजे ती जावयाची नाही. कोणत्याही रात्री केव्हाही पहा, हा मत्स्य ध्रुवस्थानाजवळ कोठे तरी असावयाचाच. तो कधी मावळत नाही. कधी सतत २४ तास काळोख असता, तर ध्रुवाभोंवती होणारी त्याची पूर्णप्रदक्षिणा आपल्यास दिसली असती. जूनच्या आरंभी ९ वाजतां ध्रुवमत्स्य मध्यान्हवृत्ताच्या सुमारास ध्रुवाच्या वर दिसतो. तिसऱ्या नक्षत्रपटांत दाखविल्याप्रमाणे व त्यांत लिहिल्या वेळी तो खाली दिसतो. त्या वेळी त्याचे तोंड क्षितिजास लागावयास झालेले असते. दुसऱ्या नक्षत्रपटांत लिहिल्याप्रमाणे तो ध्रुवाच्या डाव्या बाजूस दिसतो. व त्याचप्रमाणे केव्हां केव्हां उजवीकडे दिसतो. फेब्रुआरीपासून सहा महिने रात्री केव्हा तरी तो ध्रुवाच्या वरून उजवेकडून डावेकडे जाऊन मध्यान्हवृत्ताचे उल्लंघन करितो. आणि आगष्टपासून सहा महिने खालून करितो, त्या वेळी तो डावेकडून उजवेकडे जातो. ह्या लंघनांस आपण ऊर्ध्वलंघन आणि अधोलंघन असे म्हणूं.

 सूर्य, चंद्र आणि तारा पूर्वेस उगवतात, पश्चिमेस मावळतात; पुन्हा दुसरे दिव-