पान:ज्योतिर्विलास.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८    ज्योतिर्विलास.

 आतां आपण सर्व तारांच्या मध्ये खुंटासारखा असणारा सर्वांचा नायक ओळखू या. सप्तर्षीची ओळख असेल तर ध्रुव ओळखण्यास सोपे, म्हणून प्रथम सप्तर्षि पाहूं. जमिनीवर उताणे पडून आकाशाकडे डोळे लाविले असता जशी आकाशाची स्थिति दिसेल, तशी निरनिराळ्या महिन्यांतली स्थिति नक्षत्रपट पहिला, दुसरा व तिसरा यांत दाखविली आहे. आपले नेत्र आणि आकाश यांच्या मध्ये नकाशा धरावा. आणि नकाशा हे आकाश समजून त्यांत तारा पहाव्या. मग नकाशा एकीकडे करावा. म्हणजे त्याच तारा तशाच आकाशांत दिसतील, व त्यांतल्या कोणत्या तारेचे काय नांव हें नकाशावरून समजेल. लहानमोठ्या तारांच्या निरनिराळ्या खुणा नकाशांत लिहिल्या आहेतच. उत्तरेकडे डोके करून उताणे पडले असतां, वर समोर खस्वस्तिक येऊन उजव्या बाजूस पश्चिम व डाव्या बाजूस पूर्व येते. म्हणूनच आकाशाचा नकाशा वर उत्तर, खाली दक्षिण, असा धरिला असतां त्यांत उजवे हातास पश्चिम व डावे हातास पूर्व लिहितात. पृथ्वीच्या नकाशांत उजवेकडे पूर्व आणि डावेकडे पश्चिम असते. त्याच्या उलट आकाशाच्या नकाशांत कां हे आतां तुमच्या लक्षात येईलच. तारा पाहण्यास उताणेच पडले पाहिजे असे नाही. ज्या दिशेच्या तारा पहाणे असेल तिकडे तोंड करून उभे राहावें. मग वर तोंड करून आकाशाच्या दिशांशी नकाशाच्या दिशा मिळतील, अशा रीतीने आपले नेत्र आणि आकाश यांच्यामध्ये नकाशा धरावा. म्हणजे नकाशा आणि आकाश यांची तुलना करून तारांची ओळख ज्याची त्यास करून घेता येईल. एकाद्या रात्री ९ वाजतां जशी तारांची स्थिति दिसते, तशीच एक महिन्यापूर्वी ११ वाजतां व एक महिन्यानंतर ७ वाजतां दिसते. म्हणजे महिन्यांत सुमारे दोन तासांचा, पंधरा दिवसांत एका तासाचा, व रोज सुमारे चार मिनिटांचा फरक पडतो. एका रात्री कोणा एका वेळी तारा जेथे दिसतात त्याहून पश्चिमेस एक अंशावर त्या दुसरे रात्री तितके वाजतां दिसतात. म्हणजे दररोज एक अंश पश्चिमेस जातात. आज सात वाजतां खस्वस्तिकी दिसल्या, तर तीन महिन्यांनी तेव्हां मावळावयास जातात. हे दोन नियम लक्षात ठेवावे. एकाद्या रात्री पहाटेस पांच वाजतां जी स्थिति दिसते, तीच पांच महिन्यांनी आवशीस सात वाजतां दिसते, हाही नियम फार उपयोगी आहे.

 नकाशांत तारखा लिहिल्या आहेत, त्यावरून नकाशाप्रमाणे स्थिति कोणत्या महिन्यांत कधी किती वाजतां दिसेल हे समजेल. इतर दिवशी तशी स्थिति केव्हां दिसेल किंवा अमुक वाजतां कशी स्थिति दिसेल हे वरील दोन नियमांवरून समजेल. नकाशांत वेळ लिहिला आहे तो निजकाल म्हणजे ज्या त्या ठिकाणचा काल ( लोकल टाइम ) समजावा. ह्याविषयी विवेचन पुढे एका प्रकरणांत आहे.

 अप्रिलच्या सातव्या तारखेस रात्री सात वाजता उघड्या जागी उत्तराभिमुख उभे राहून आकाशाकडे डोळे करून पहिला नक्षत्रपट पहा. उत्तर दिशा खाली, डाव्या बाजूस पश्चिम, आणि उजव्या बाजूस पूर्व, असा तो धरा. त्यांत उजव्या