पान:ज्योतिर्विलास.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
   ज्योतिर्विलास.

धिकच उत्सुक झाले. इतक्यांत ग्रहणापासून मुक्त झालेला चंद्र दिसू लागला. तेव्हां सर्वांचा आनंद गगनीं मावेना. पण दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताबरोबर चंद्र दिसेना. तिसरे दिवशीही तसेंच झाले. एक दिवस झाला, दोन झाले, तीन झाले, तरी चंद्र पूर्वीप्रमाणे सायंकाळी सूर्यास्ताबरोबर दिसेना, तेव्हां चंद्रावर असें संकट तरी काय आले आहे, आज चंद्रदर्शन झाल्यावांचून अन्न घ्यावयाचे नाही, असा पुन्हा चतुर्थ दिवशी पुष्कळांनी निश्चय केला. तेव्हां त्या संकष्टनाशनव्रतानेच की काय त्या दिवशी (चतुर्थीस) चंद्र सुमारे आठ घटका रात्रीस प्रसन्नवदन उगवलेला दिसला. तरी पण त्याजवर काही तरी संकट आले होतें खरेंच, असे दिसून आले. तो पूर्णिमेच्या रात्रीप्रमाणे पूर्ण नव्हता. त्याचा बराच भाग नाहीसा झाला होता.

 याप्रमाणे मंडळीचा क्रम बरेच दिवस चालला. तितक्या अवकाशांत आकाशांत पुष्कळ उलाढाली झालेल्या दिसल्या, त्यांत चंद्र हा रोज दोन दोन घटका मागाहून उगवतो असें अनुभवास आले. पुढे दहा बारा दिवशी सहज आकाशाकडे दृष्टि गेली, तो पूर्वेकडे चंद्रकला दिसली. तेव्हां पहिल्या दिवशी सायंकाळी पश्चिमेस चंद्रकोर दिसली होती, तिचे स्मरण झाले. दुसरे दिवशी तर चंद्र आवशीस* दिसला नाही व पहाटेसही दिसला नाही. अर्थात् सर्व रात्रीत मुळीच उगवला नाही. हा चंद्र गेला तरी कोठे? तो आकाशांतून अगदी नाहीसा झाला की काय ? अशा विवंचनेत आह्मी आहों, तो काय आश्चर्य सागावें, दुसरे दिवशी तो पश्चिमेस मागल्याप्रमाणे दिसूं लागला. त्या चंद्रदर्शनानें झालेला आनंद काय सांगावा ! शुक्र प्रथम जेथे दिसत होता तेथेच पुढेही पुष्कळ दिवस दिसत होता. त्याच्यासारख्या तेजस्वी दोन तारा दक्षिणेस प्रथम दिसत होत्या; त्या शुक्राहून काही लहान दिसत होत्या, तरी त्यांची चकाकी काही विलक्षण हाती. यामुळे त्यांजकडे सहज लक्ष जाई. त्यांतली एक प्रथम बरीच म्हणजे सुमारे शुक्राइतकी उंच दिसत होती. दुसरी तिच्या दक्षिणेची बरीच खाली दिसत असे. उत्तरात्तर त्या दोहोचीही उंची कमी दिसू लागली. त्या सूर्याच्या जवळजवळ जात आहेत असे दिसले. त्यांत दक्षिणेस जी होती ती तर प्रथम आह्मांस पश्चिमेस चंद्रदर्शन झाले त्यानंतर सात-आठ दिवसांनी मुळीच दिसेनाशी झाली. व दुसरीही तिच्या भेटीस जात आहे असे वाटले. आणि त्याप्रमाणे सुमारें एक महिन्याने तीही दिसेनाशी झाली. हे काय आहे, पश्चिमेकडच्या सर्वच तारांची अशी अवस्था होणार की काय, असे आमच्या मनात येऊन अंमळ लक्षपूर्वक पाहूं लागलों तो तो संशय खरा झाला. तारा एकमेकींपासून जितक्या अंतरावर दिसत होत्या तें अंतर तर मुळीच कमजास्त झाले नाही, पण उत्तरोत्तर त्या सर्वांचे पश्चिमक्षितिजरेषेशी

-----

 * हा शब्द कोंकणांत प्रचारांत आहे. इतर प्रांतांत फारसा नाही. त्याचा अर्थ रात्रीच्या पूर्वभागी आठ नऊ वाजेपर्यंत असा आहे. हा शब्द पुस्तकांत पुष्कळ वेळां घालावा लागेल. ह्याच्या ऐवजी पांच चार शब्द घालण्यापेक्षा हा लहानसा शब्द घालणे बरें, म्हणून तसे केले आहे. एक दोन वेळां गांठ पडल्यावर त्याचा परिचय सहज होईल.