पान:ज्योतिर्विलास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हा काय चमत्कार आहे?    

लागले. तिसऱ्या रात्री पाहतां तसेच झाले. चंद्राचे तेज आणखी एक कला वाढले असून तो शुक्रास मागे टाकून पुढे पूर्वेस गेला. याप्रमाणे चंद्र प्रतिदिवशी वाढत झपाट्याने पुढे पुढे पूर्वेकडे जात चालला. सुमारे पंधरा दिवसांनी सायंकाळी तो पूर्वेस उगवला. त्या वेळी त्याचा आरक्तपणा काय सांगावा! तो केवढा तरी मोठा दिसत होता! पहिल्या दिवशीची लहानशी चंद्रकोर कोणीकडे, आणि त्या दिवशीचा तो पूर्ण चंद्र कोणीकडे. जसजसा वर येत चालला तसतशी त्याची आरक्तता कमी होत चालली. आणि त्याचे बिंब किंचित् लहान परंतु आल्हादकारक दिसू लागले. अहाहा, किती तरी त्याचें तेज रमणीय आणि शीतल! सगळा दिवसभर कितीही श्रम मनुष्यास झाले असले तरी क्षणभर चांदण्यांत बसतांच त्या श्रमांचा परिहार होतो. फार तर काय, पण त्या आनंदांत तहानभूकही नाहीशी होऊन सर्व रात्र चांदण्यांतून उठू नये असे वाटते. आमची त्या रात्री अशीच स्थिति झाली. किती काळ आह्मी या कौमुदीमध्ये मोद पावत होतो ह्याचे आह्मांस भानही राहिले नाही. परंतु काय सांगावें, आमचा हा आनंद त्या मत्सरी दैवास सहन झाला नाही असे दिसते. एकाएकी चंद्रबिंब पूर्वेच्या बाजूस काळे दिसू लागले. पहातां पहातां अर्धे बिंब काळे पडले. आणि उत्तरोत्तर तो क्रम चाललाच होता. चंद्रास कोणी घेरले ? त्याचा कोणी ग्रास करीत आहे की काय ? असे विचार आमचे चालले आहेत, इतक्यांत बिंबाच्या बहुतेक भागाचे ग्रहण झाले. आतां सगळ्या चंद्राचा ग्रास होतो की काय अशी आह्मांस भीति पडली. बहुतेक भाग ग्रस्त झाला. आमच्या सुदैवाने सुमारें द्वितीयेच्या चंद्राहूनही फार कमी इतकी कोर मात्र नैर्ऋत्येकडची शिल्लक राहिली, व बाकीचे सर्व बिंब आरक्त दिसू लागले. तो आरक्तपणा चंद्रोदयींच्या आरक्तपणाहन निराळा होता. शेष राहिलेला तेजस्वी भागही जातो की काय अशा चिंतेत बराच वेळ आह्मी होतोः इतक्यांत तेजस्वी भाग वाढत चालला, तेव्हां आमच्या जीवांत जीव आला. काही वेळाने बरेच ग्रहण सटले. इतक्यांत, चंद्राचा ग्रास झाला आहे त्यास सोडवावें म्हणूनच की काय पूर्वेस त्याचा मित्र* वर येत आहे अशी चिन्हें दिसू लागली. त्याच्या प्रभावाने की काय न कळे, तो येण्यापूर्वीच बहुतेक ग्रहण सुटले. इतक्यांत सूर्याने मस्तक वर केलें; व तो त्या चंद्राकडे निरखून पहात आहे असें आह्मांस दिसले. तरी त्यावेळी ग्रहण पूर्ण सुटले नव्हतेच. तेव्हां, मित्र प्रत्यक्ष आला असतांही आपले संकट दूर होत नाही, असा मित्र काय कामाचा ? असे वाटून व हा आपला अपमान झाला अशी समजूत होऊनच की काय चंद्र लागलाच क्षितिजाच्या आड खाली गेला. ग्रहणांतून चंद्र मुक्त होईल अशी आशा आह्मांस लागली असून ती पूर्ण होण्याचा संभव दिसत आहे, तोच ग्रहणमोक्ष न होतां चंद्र दिसेनासा झाला. यामुळे दुःखित होऊन कित्येकांनी त्या दिवशी अन्नपाणीही घेतले नाही. सायंकाळी सूर्यास्त झाला तरी रोजच्या प्रमाणे चंद्र दिसेना; तेव्हां त्यास पाहण्याविषयी सर्व लोकांचे नेत्र अ-

-----

 *मित्र शब्द सूर्याचाही वाचक आहे हे सुप्रसिद्धच आहे.