पान:ज्योतिर्विलास.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



हा काय चमत्कार आहे?    

मात्र अंतर कमी कमी होऊ लागले. उत्तरेस ७ तारा चांगल्या तेजस्वी दिसत होत्या, त्याही प्रथम जेथे दिसल्या त्याच्या काहीशा डाव्या बाजूस महिन्याभराने दिसूं लागल्या. पूर्वेकडे काय हवाल आहे म्हणून लक्षपूर्वक पहावयास लागलों तों तिकडे उलट स्थिति झाली. म्हणजे प्रथम सूर्यास्तानंतर लवकरच ज्या तारा उगवत होत्या त्या एक महिन्यानंतर सूर्यास्त झाल्यावर पुष्कळ वर दिसू लागल्या; व त्यांच्याखाली नव्याच तारा आल्या. पश्चिमच्या तारा गेल्या तर त्यांच्या ऐवजी पूर्वेस नवीन आल्या, ही ईश्वरी योजना पाहून आश्चर्य व समाधान वाटले.

 शुक्र एका जागीच दिसत होता, तरी त्याच्या जवळच्या तारा पश्चिमेस जात चालल्या होत्या. अर्थात् त्यांच्या संबंधाने पाहिले असतां तो पूर्वेस चालला होता. सर्व आकाशांत यावेळी दुसरी एकही तारा अशी दिसली नाही.

 एके दिवशी सायंकाळी याप्रमाणेच आमची करमणूक चालली असतां, अकस्मात् एक तारा आकाशांतून तुटून खाली येत आहे असे दिसले. तिचे तेज फार असल्यामुळे तिजकडे लागलेच सर्वांचे लक्ष लागले. तिची चपळता काय सांगावी ? पहातों न पहातों इतक्यांत डावेकडून आमच्या डोक्यावरून उजवीकडे खाली येऊन ती दिसेनाशी झाली. त्या वेळी मोठी गर्जना झाली. त्या तारेचें तेज माणकासारखे होते. व ते क्षणभर इतकें जाज्वल्य दिसले की, माणकाच्या रंगाचा चंद्र उगवून त्याचे हे चांदणे पडले आहे की काय असे वाटले. कोलीत फिरविले असतां जशी तेजाची रेषा दिसते तशी त्या तारेच्या जाण्याच्या मार्गात तेजोरेषा दिसत होती. जणुकाय आकाशरूप कसोटीवर तारारूपी सुवर्ण घासले त्याची ती रेषाच उमटली आहे. त्या तारेची अतर्क्य त्वरा, पृथ्वीवर पडून कांही प्रदेशास दग्ध करितें काय असे दिसणारे तिचे विलक्षण तेज, भीति वाढविणारी तिची ती गर्जना, ह्या गोष्टींनी मनावर एककालींच आश्चर्य, विस्मय, भीति इत्यादि मनोविकार उद्भवून मन चकित झाले. सगळ्या तारा तुटून आकाश शून्य होते की काय, व तें पृथ्वीवर कोसळून प्रळय करिते की काय, अशीही शंका येऊ लागली. त्यामुळे पुढे या गोष्टीकडे विशेष लक्ष लागून रोज एकादी लहान मोठी तारा तुटलेली दिसू लागली.

 काही दिवसांनी आमच्या मंडळीपैकी एकास कोणा गृहस्थाचे लिहून आले की पहाटेस एक बारीक तारा दिसते तिला शेंडी आहे. म्हणून आह्मी पाहूं लागलों तो ती त्याप्रमाणे दिसली. तिचे धूम्रपुच्छ लहानच होते, परंतु ते पाहून नऊ-दहा वर्षांपूर्वी पाहिलेल्या अशाच एका चमत्काराची आठवण झाली. व तेव्हांच्या तारेची आकाशांत लांबवर पसरलेली ती शिखारूप पताका आणि तिचें तें विस्मयावह तेज ही डोळ्यांपुढे उभी राहिली. अशा प्रकारचे धूमकेतु, पतन पावणाऱ्या तारांपेक्षाही मनाची स्थिति चमत्कारिक करितात.

 एकदां पूर्णिमेच्या रात्री चांदण्यांत आम्ही काही मंडळी बोलत बसलों असतां, सहज चंद्राकडे दृष्टि गेली व त्याच्या त्या नेत्रांस आनंद देणाऱ्या अतिमनोहर