पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) पहिल्या भागांत निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, व चांगदेव यांनी जी अभंगरचना केली आहे तिचा संपूर्ण गोषवारा त्यांच्याच शब्दांत दिला आहे. दुसऱ्या भागांत नामदेव व तत्कालीन संतकवि यांच्या निवडक अभंगांची विषयवार रचना करून परमार्थाचे रहस्य त्यांच्या तोंडून सांगितले आहे. या संतकवींमध्ये ज्यांचे ज्यांचे अभंग उपलब्ध आहेत अशा सर्व संतांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. गोरा कुंभार, विसोबा खेचर, सावता माळी, नरहरि सोनार, चोखामेळा, जनाबाई, सेनान्हावी, कान्होपात्रा, या सर्व जातींच्या व व्यवसायांच्या संतांचा उल्लेख येथे केला आहे. तिसऱ्या भागात भानुदास, जनार्दनस्वामी, व एकनाथ यांच्या अभंगांची विषयवार निवड करून त्यांच्या तोंडून परमार्थाचे रहस्य सांगितले आहे. अध्यात्मग्रंथमालेच्या तिसऱ्या पुस्तकांत संतशिरोमणि तुकारामांचें अध्यात्मचरित्र व अध्यात्मोपदेश त्यांच्याच वचनांच्या आधारे सांगितला आहे. शेवटच्या म्हणजे चवथ्या पुस्तकांत रामदासांच्या दासबोध व इतर संकीर्ण ग्रंथांच्या आधारें रामदासांची पारमार्थिक व व्यावं. हारिक शिकवण कशी होती हे सांगितले आहे. यावरून ही गोष्ट उघड होईल की, ही चार पुस्तकें म्हणजे महाराष्ट्रधर्माचा मूलरूपाने संपूर्ण इतिहासच होय. या चारी पुस्तकांस विस्तृत विवेचनात्मक प्रस्तावना जोडल्या असून त्यांमध्ये त्या त्या साधूंचे पारमार्थिक वर्म शक्य तितकें उघड करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या चारी पुस्तकांचा अभ्यास केल्यास महाराष्ट्रवाङ्मयामध्ये परमार्थाचे रहस्य निरनिराळ्या संतांनी कसे सांगितले आहे हे पूर्णपणे निदर्शनास येईल. ज्ञान, भक्ति, व कर्म यांचा त्रिवेणीसंगम जर कोठे झाला असेल तर तो आमच्या महाराष्ट्रवाङ्मयांतच होय. ज्ञानेश्वरांप्रमाणे ज्ञानी, नामदेवतुकारामांप्रमाणे भक्तिमान् , व रामदासांप्रमाणे कर्मयोगी लोक आमच्या महाराष्ट्रांतच निर्माण झाले. आजचा आपला प्रसंग