पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


इथे बहुधा आध्यात्मिक लेखन प्रकाशित होत असे. माझ्या लेखनाची बैठक सामाजिक असल्याने मी त्या अंगाने लेखन करूनही ते पसंत केले गेले हे विशेष.
 दैनिक पुण्यनगरीचं ‘सुखद धक्का' सदर आत्मपर असल्याने व ते सार्वत्रिक लेखनातून चालत असल्याने निमंत्रित त्यात लिहीत. त्याप्रमाणे मी एकदा स्फुट लिहिले होते.
 या सर्व सदर लेखनाने मला त्या-त्या वेळी अंतर्मुख केले.मागे वळून पाहात हे लेखन झाले.ते समकालाशी साद घालणारे होईल असे मी पाहिले. स्मरणरंजनातून चिरंतन चिंतन असं त्याचं स्वरूप होतं.
 स्फुटलेखन करीत असताना लेखकाला एकाचवेळी अनेक व्यवधाने पाळावी लागत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती नियमितता. निश्चित वेळेत स्तंभाचा मजकूर वृत्तपत्र कचेरीस पोहोचवणे आवश्यक असते. वृत्तपत्र नि सूर्य प्रकाशित होत नाही असे सहसा घडत नाही.त्यामुळे तुमची नियमितता ही स्तंभलेखकाची विश्वासार्हता ठरत असते.ही विश्वासार्हता वाचकांप्रती असते. त्यामुळे वाचक व स्तंभलेखकात त्या- त्या काळापुरते ऋणानुबंध तयार होत असतात.तुमचा वार वाचकांच्या सवयीचा झाल्याने ते स्तंभ लेखनाची जागा शोधून प्रथम स्तंभ वाचन व नंतर वृत्त वाचन करतात असेही घडते. ती तुमच्या लेखनास मिळालेली वाचकांची पोच व पसंती असते. मी गेले दशकभर अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकात स्तंभलेखन केले. दहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रे ही विचारपत्रे होती. वृत्तांइतकेच महत्त्व स्तंभांना असायचे. जागतिकीकरणामुळे विचार नि वृत्तांवर जाहिरातींचे आक्रमण झाले आहे. पूर्वी वृत्तपत्रात संपादक प्रमुख होता. त्याची जागा आता व्यवस्थापक, वितरण प्रमुख, जाहिरात व्यवस्थापकांनी घेतल्याने वृत्तांवर जाहिरातीचा कोट चढविण्यात वृत्तपत्रांना काही वाटेनासे झाले आहे. स्तंभलेखकाने असीधारा व्रत घेऊन नियमित लेखन केले तरी ते नित्यनेमाने नियत जागी प्रकाशित होईल याची खात्री संपादक आता देऊ शकत नाही. इतकेच काय उद्याच्या अंकात स्तंभ प्रकाशित होऊ शकत नसल्याची दिलगिरी संपादक छापत नाहीत.शिवाय स्तंभलेखकास मजकूर प्रकाशित होणार नसल्याची पूर्वसूचना व दिलगिरी व्यक्त करणे संपादकांना शिष्टाचार म्हणूनही आवश्यक वाटेनासे झाले आहे.याला काय म्हणावे? लेखक व्रत म्हणून लिहितो, पैशासाठी नाही. शिवाय वाचक वृत्तपत्रे आगाऊ पैसे देऊन विकत घेतात ते वृत्त नि स्तंभ वाचण्यासाठी,जाहिरातींसाठी नाही. स्तंभांसंदर्भातील वाचक प्रतिक्रिया,