पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रतिसादास माहिती तंत्रज्ञान आणि सामाजिक संपर्क जालाच्या (Social Networking) काळात जागा दिली जात नसल्याचे वैषम्य नि आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. लाईक, कॉमेंटच्या काळात हे सहज शक्य असताना त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ही संपादकांची उपेक्षा की अनास्था कळण्यास मार्ग नाही.
 ‘जाणिवांची आरास'हा माझा गत दशकातील विविध वृत्तपत्रांतील स्फुटलेखनाचा संग्रह होय. या लेखनात मी प्रसंगोपात निर्माण झालेले विचारमंथन शब्दबद्ध केले. प्रसंग छोटे, क्षणिक असले तरी त्यातून दिलेला आचार,विचार माणसास प्रगल्भ बनवेल असे मी पाहिले. माझे लेखन छंद म्हणून होत असले तरी तो मी शिळोप्याचा खटाटोप होऊ दिला नाही. आपल्या लेखनातून वाचकास विचार,कृती,व्यवहार,मार्गदर्शन मिळून तो जाती-धर्मनिरपेक्ष, समता, बंधुता, स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांना मानणारा व्हायला हवा अशी लेखनामागे माझी सतत भूमिका राहिली आहे. देव, दैव,पारंपरिक धर्म, जातीयता, अंधश्रद्धा, वैरभाव यांना छेद देणारे लिहिले.ते माझ्या जाणीव व नेणिवेतही मानव हीच जात,मानव हाच धर्म असा मनुष्य हितैषी विचार पारदर्शी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ व स्पष्ट होता नि आहे.हे लेखन त्या अर्थाने माझ्या ‘जाणिवांची आरास' होय.
 स्फुटलेखनास अलीकडच्या काळात संपादक शब्दमर्यादा घालून देतात. त्या मर्यादेतच मी लिहीत राहिल्याने माझ्या संक्षिप्त मजकुरास कधी संपादकीय कात्री लागली नाही. मला हेही या ठिकाणी नमूद करायला हवे की मी लिहायला लागल्यापासन मला माझ्या लेखनास संपादकांच्या सेन्सॉरशिपचा स्पर्श झाला नाही. त्यामुळे माझे विचार जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहोचत राहले. माझे लेखन व वक्तृत्त्व मी सहजसंवादी ठेवले, त्यात कोणताही अभिनिवेश, शैलीचा आग्रह राखला नाही. त्यामुळे ते सुबोध होत राहिले. ते हृदयस्पर्शी असते असा वाचक, श्रोता यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद मला लेखन , भाषण, वाचनास प्रेरणा नि प्रोत्साहन देत राहतो. माझ्या लेखन सातत्याचे तेच बलस्थान, प्रेरणास्थान नि गमक होय. लेखन मी निर्वैर होईल असे पाहिले म्हणण्यापेक्षा ते तसे झाले. कारण मी माझी घडण तशी होईल,माझा व्यवहार तसा होईल असे पाहिले. याचे वाचकांना सतत आश्चर्य नि आकर्षण वाटत राहिले आहे. यातून अन्य लेखन कसे असते याची जाणीव होत राहिली व मी माझ्या जाणिवांची आरास नेणिवेतही तशीच जपली, जोपासली. त्यामुळे स्फुटलेखन वाचनीय, विचारणीय, आचरणीय बनत गेले.