पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अस्वस्थ प्राजक्त फुलणार तरी कधी? कसा?

 ‘जाणिवांची आरास' हा माझा स्फुटसंग्रह होय. दैनिक लोकमत, कोल्हापूर आवृत्तीमध्ये सन २००६ मध्ये मी ‘गुड मॉर्निंग' या सदरात प्रासंगिक घटना, प्रसंगांच्या निमित्ताने माझ्या मनात आलेले विचार शब्दबद्ध केले होते. हे दैनिक सदर होते. मी गुरुवारी लिहीत असे. तत्कालीन आमदार राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), हुसेन जमादार (पुरोगामी मुस्लीम कार्यकर्ते), प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर (पर्यावरण तज्ज्ञ), विलास मोहिते (माजी पोलीस अधिकारी), प्रा. शिवाजीराव भुकेले (आध्यात्मिक वक्ते), पैलवान संभाजी पवार (माजी आमदार) या सदराचे सहलेखक होते. विषय, आशय, शैली वैविध्यामुळे ते सदर त्या वेळी लोकप्रिय ठरले होते.
 त्यानंतर सन २००८ मध्ये दैनिक तरुण भारत (बेळगाव) च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी ‘अनुभव' सदरात दोन एक महिन्यासाठी लेखन करून आठ एक स्फूटे लिहिली होती. हे सदर अल्पकालिक होते की मीच अल्पकाल लिहिले ते काही आज आठवत नाही.
 अलीकडे दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स' च्या ‘सगुण-निर्गुण' सदरासाठी एप्रिल ते जुलै २०१७ मध्ये मी लेखन केले. ते चार महिन्यांसाठी होते. सर्वश्री सुधाकर गायधनी, डॉ. पितांबर पाटील, रेणू पाचपोर, रामदास भटकळ माझ्याबरोबर लिहीत. हे जुने सदर. त्याचा वाचक वर्ग मोठा. शिवाय ते महाराष्ट्रभरच्या सर्व आवृत्त्यांत प्रकाशित होत असल्याने त्याला विस्तृत प्रसिद्धी मिळाली व मोठा वाचकवर्गही मिळाला. ‘टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रकाशित होणा-या 'Speaking Tree' ची ही मराठी आवृत्ती.