पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे. अलीकडे मी अनेकदा विमानातून प्रवास करतो. एअर पोर्टवर 'चेक इन' झाल्यावर बोर्डिंग पास घेताना मी स्वागतिकेला आवर्जून ‘रिअर साईड विंडो'(मागील बाजूची खिडकी) या जागेचा मोठा फायदा असतो.तिथं डोक्यावरच्या शेल्फवर विमानातली सर्व वर्तमानपत्रं, मासिके ठेवलेली असतात. एअर होस्टेसला एकदा सांगून मनमुराद सारी वर्तमानपत्रं,मासिक वाचता येतात. विमानातल्या शिष्ट,अबोल, गंभीर प्रवाशांकडे ढुंकून न बघता खालची गावं, दिवे न्याहाळत प्रवास कसा मस्त होऊन जातो.सोबत वारंवार येणारी कॉफी, ज्यूस, स्नॅक्स नि लंचमुळे तर पैसे फिटून जातात- (नि एअर होस्टेसमुळे डोळ्याचे पारणेही!)
 रोजचा माझा दिवस वर्तमानपत्रांनी उगवतो नि मावळतोही! वेळेप्रमाणे मात्र, वर्तमानपत्रंही वेगवेगळी मिळण्याची अट असते. मुंबईत असेल तर ‘मिड डे' लागतो. पुण्यात असेल तर ‘संध्यानंद' हवा. विदेशातील प्रवासाने मला हॉटेल्स निवडण्यात पारंगतच करून टाकलंय. काही हॉटेल्स चक्क ‘गुड मॉर्निंग' असा शिक्का मारून ‘बेड टी' बरोबर ‘बेड पेपर' ही देतात. अशा हॉटेल्सशी माझी मैत्री आता जुनी झालीय. वर्तमानपत्रं नुसती वर्तमान सांगत नसतात. ती रोज भविष्य घडवितात. माणसं घडवितात असं मला वाटतं. ती तुम्हास वैचारिक लेख देऊन गंभीर करतात. तशी 'जाहीर नोटीस' म्हणून दिलेल्या मजकुरातून माणसांचे कंगोरेही समजतात. वर्तमानपत्र तुमची अनेक प्रकारची, जाण, समज, विकसित करतं. फक्त ती समज, जाणीव तुमच्यात सुप्त असावी लागते. जाणीवांची आरास घेऊन येणारी वर्तमानपत्रं माणसात संवेदनांची कारंजी,भावभावनांचे वसंत घेऊन येतात,तेव्हा मला आकाश ठेंगणे होते.

***

जाणिवांची आरास/२८