पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जाणिवांची आरसपानी वर्तमानपत्रं

 माझ्या घडणीत ज्या अनेक गोष्टींचा वाटा आहे, त्यात वृत्तपत्रांना अढळ स्थान द्यावं लागेल. आपली ही तशीच भावना असेल. एखाद्या वडा-भजीच्या गाडीजवळून जाताना जसा खमंग वास आपणाला भुरळ घालतो तशी वृत्तपत्रं मला भुरळ घालतात. सकाळचा पहिला चहा नि करकरीत वर्तमानपत्र हे समीकरण तर सर्वांचच. पण मला ताज्या पेपरचा वासही येतो, माझ्या एका मित्राला तर वर्तमानपत्र वास घेत वाचायची सवयच आहे मुळी. पेपर स्टॉल्स मला नेहमी एखाद्या जीवलगासारखे वाटत आलेत. काही खादाड माणसं मिठाईच्या दुकानात सर्व पदार्थांची मिटक्या मारत खरेदी करतात. तशी मी वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं खरेदी करत असतो पेपर नि बुकस्टॉलवर.

 प्रवास नि वर्तमानपत्राचं माझंं अद्वैत तर जुनंच! पेपरशिवाय प्रवास म्हणजे माणसांशिवाय राहणं. पेपर्सची चवड नि चुरमुरे-शेंगदाण्याचा फराळ ही प्रवासातील स्वर्गसुखाची खूणगाठच. ज्या एस.टी.स्टॅडवर पेपर स्टॉल नसतात ती गावं मला पेडगाव वाटतात. प्रवासात शेजारी बोलणारा अन् वाचणारा भेटला की प्रवास सुखकर होतो. खरं अलीकडे एक्स्प्रेस हायवे झाल्यापासून मला प्रवासात मासिकं, पुस्तकं आवश्यक वाटू लागलीत.
 प्रवासावरून आठवलं, रेल्वेच्या प्रवासात जंक्शन आलं की मी पहिल्यांदा व्हिलर्स स्टॉल शोधतो. त्यात मग गुलशन नंदा, कर्नल रंजीत, जेम्स हेडली चॉईस भेटले की अनेक दिवसांचे प्रवास क्षणाचे होऊन जातात. रेल्वेच्या प्रवासात दीर्घ वाचनाचं जे सुख आहे ते घोस्ट रिडींगला लाजवणारं असतं. त्यात राजधानी, इंटरसिटीचा प्रवास असेल तर क्या कहने?

जाणिवांची आरास/२७