पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/165

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाम्या' असं जीर्ण त्यांनी आयुष्यभर जगायचं. काडीचं कर्तृत्व नसताना संस्थापकांचा, अध्यक्षांचा नातू, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर दुसरीकडे शिपाई, लिपिक, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने ‘एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.

    विशेषतः समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं या समाजाला जागतिकीकरणाने दिलेला अभिशाप आहे. माध्यमातील नोकरदारही याला अपवाद राहिलेले नाहीत. समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिमंद व मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यांसारखे सामाजिक अधःपतन दुसरे कोणते असू शकते? सध्या सर्वत्र लीन संप्रदाय वाढतो आहे. तो सामाजिक, सार्वत्रिक, सांसर्गिक प्रादुर्भाव वाटावा इतका त्याचा झपाट्याने प्रसार होतो आहे. त्यात खेदाची बाब म्हणजे, हा सारा खटाटोप सार्वजनिक साधनसंपत्तीच्या बळावर व्यक्तिप्रतिष्ठा जोपासण्याकामी खर्च पडतोय.
   यासाठी जनजागृती, जनसंगठन, जनमतसंग्रह आदी उपायांची चर्चा कालौघात होईलच; पण याला हस्तक्षेप म्हणून त्वरित व्यवस्था बदलाच्या दृष्टीने समाजमनाने अंतर्मुख होऊन सक्रिय व्हायला हवे. समाजजीवनात विश्वस्तवृत्तीचा विकास होणे हा त्यावरचा खरा उपाय आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक सर्वच क्षेत्रांत सर्वोच्चपदी जाणारी व्यक्ती ‘इदं न मम' म्हणणारी असेल तर मी तो भारवाही हमाल' अशी निरीच्छता त्याच्या ठायी येणार; पण त्यासाठी मोठ्या मूल्यसंस्कार व नैतिक पाठराखणीची गरज असते. मार्क्सवाद काय नि गांधीवाद काय, विचार म्हणून सर्वच वाद आदर्श असतात; पण वादाची सत्ता आली की, वादी विश्वस्त न राहता सत्ताधारी बनतात. यासाठी माणसाची जडणघडण । महत्त्वाची. बुद्धीप्रामाण्य नागरिकांची निर्मिती शिक्षण व संस्कारातून होते. त्यासाठी घर, समाज, गाव, राज्य, राष्ट्र अशा सर्वच स्तरांवर त्याविषयीची भावसाक्षरता आणि संवेदनासूचकांक जपणे हे खरे लोकशिक्षण होय. त्यासाठी स्वतंत्र माणसाची घडण हे उद्दिष्ट हवे.
  ‘पेड-पौधे है बहुत बौने (बुटके) तुम्हारे, रास्तों में एक भी बरगद (वड) नहीं है।'
  कवी दुष्यंत कुमारांच्या या ओळी उगीचंच आठवत राहतात नि अस्वस्थता वाढत राहते.


            जाणिवांची आरास/१६४