पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






सर्वांभूति समानत्व

        एक पंडित होते. नावेतून रोज पलीकडच्या मंदिरात मंत्रोच्चार करीत देवदर्शनार्थ जात असत. नावाडी अडाणी होता. एक दिवस न राहून त्याने पंडितास विचारले, “तुम्ही रोज काय पुटपुटत असता, ते मला काही कळत नाही. सांगाल का?' पंडित म्हणाले, “अरे मी संस्कृत मंत्र म्हणतो. तुला संस्कृत नाही येत? तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं म्हणायचं.' हे ऐकून नावाड्याला आपण अडाणी राहिलो याचे शल्य वाटत राहिले. असेच काही दिवस गेले. नदीला पूर आलेला. नावाडी नेहमीप्रमाणे पंडिताला पैलतीरी घेऊन निघालेला. नदीपात्राच्या मध्यावर असताना नावेची तळातील जीर्ण फळी पाण्याच्या जोराने उचकटली नि नाव बुडू लागली. नावाडी पंडीत महोदयांना पाण्यात उडी टाका नि पोहायला लागा म्हणून समजावू लागला. पंडिताने विचारले, ‘पोहायचं म्हणजे काय करायचं?' नावाडी उडी टाकत म्हणाला, “तुम्हाला पोहायला येत नाही? मग तर तुमचं संपूर्ण आयुष्यच वाया गेलंय म्हणून समजा.'
       कोण ज्ञानी नि कोण अज्ञानी याचा आपण तपास करू लागू तर लक्षात येते की, प्रत्येक ज्ञानाचा संबंध जीवन जगण्याशी असतो. ज्ञान आहे, पण उपयोग नाही असे ज्ञान काय कामाचे? वर्तमानात तुम्ही कितीही शिकलेले असा, जर तुम्हाला संगणकीय ज्ञान नसेल तर तुम्ही अज्ञानीच. काळाप्रमाणे ज्ञानाचे स्वरूप बदलते. पूर्वी मंत्रोच्चार, पठण, श्रवण म्हणजे ज्ञान होते. नंतर लेखन, वाचन, अंकमोड म्हणजे ज्ञान झाले. वर्तमानात तेच माहिती, तंत्रज्ञान साधनाद्वारे सुदर पोहोचविता येणे ही ज्ञानीपणाची पूर्वअट होऊन गेली. असे असले तरी जीवनातील छोटी, मोठी कामे करणा-यांचे महत्त्व
                        जाणिवांची आरास/१४३