पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/143

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
    शेतकरी बी पेरून घरी बसत नाही. खुरपणी, छाटणी, पाणी देणं, खत घालणं, फवारणी करणं, राखण करणं असं हर प्रयत्नांनी तो पीक पदरी पाडून घेतो. माणसाचं आशावादी असणं दुसरे तिसरे काही असत नाही. ती असते त्याच्या मनाची ठेवण व वागण्याची पद्धत, ज्याला अलीकडे आपण जीवनशैली म्हणतो.
    निराशवादी टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वतः निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देण्याबरोबरच सक्रिय करणंही महत्त्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ‘जीवन त्यांना कळले हो' पठडीतली असतात. ती आशेने हरळत नाहीत नि निराशेने हताश होत । नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळ, गलबल्यात स्वतःस न विसर्जित करतात, न हारतात. ‘अत्त दीप भव' म्हणत ती स्वतः अंधाच्या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्नं कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर फुकाचा भरवसाही ठेवत नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो आणि भरोसाही. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन नि वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि ‘तू' याच्या पलीकडे आपण असा सामूहिक सद्भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्त्वाची वाटते. जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.
          जाणिवांची आरास/१४२