पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमी झालेले नाही. ज्ञानी समाज जितकी यंत्रे बनवेल, जितका तो यंत्रवत आणि यंत्रमय बनेल, तितके मूलभूत हस्तकौशल्याचे महत्त्व वाढेल. आजचे ज्ञान हा त्याचाच आविष्कार नाही का?

        ज्ञान हे पैसे मिळवायचे साधन की जगण्याची कला? याची फारकत होणे वर्तमानाची शोकांतिका आहे. भारतीय समाजात विशेषतः ज्ञान, श्रम । व कौशल्य यातील वाढत्या दरीनेच येथील केवळ विषमतेची दरी रुंदावलेली नाही तर शिक्षित माणसं मानसिकदृष्ट्या अडाणी व अल्पशिक्षितांना हीन, दीन, अस्पृश्य मानतात हा वर्तमानाचा सामाजिक महारोग होय. फळांनी लगडलेली फांदी ओझ्याने उन्नत न होता नम्र होते, या निसर्ग नियमाची पायमल्ली विषण्ण करणारी आहे. भारतीय समाजमानसात कमी शिकलेल्यांबद्दलचा तुच्छ भाव आपल्या सरंजामी वृत्तीचेच प्रतीक होय. शिक्षण माणसास सभ्य करण्याचे साधन व माध्यम म्हणून आपण वापरत नाही, ही आपली शोकांतिका होय.
      नुसती कल्पना करून पाहा की गवंडी, प्लंबर, सुतार, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, नर्स, लाइनमन, ऑपरेटर, शेतमजूर, मीटर रीडर नाहीत. जग सारं डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, नट, नेत्यांनी भरलेलं आहे. सर्वत्र नुसते संपादक आहेत. पत्रकार, कॅमेरामन, अँकर, प्रिंटर, कंपोझिटर नाहीत. यंत्रात सर्व भाग महत्त्वाचे तसेच समाजातील सर्व प्रकारची माणसे तितकीच महत्त्वाची. भेद, दुजाभाव, श्रेष्ठ-कनिष्ठता, उजवा-डावा असे भेद-फरक आपल्या मानसिक घडणीचा राहिलेला दोषच. ‘सर्वांभूति समानत्व हे प्रगल्भ समाजाचे लक्षण होय. प्राप्त ज्ञानाचा विवेकी वापर, निरअहंकारी वर्तन, 'मी' नव्हे 'आपण' असा सर्वग्राही, सर्वव्यापी, समाज व्यवहार नि सभ्यता म्हणजे सज्ञानता अशी ज्ञानाची व्यापकता आपण सुशिक्षित समाजाच्या वर्तन व्यवहारात रूजवू शकू तर तो खरा मानव विकास नाही का ठरणार ? केवळ भौतिक समृद्धीचं साधन म्हणून आपण ज्ञानाकडे पाहात राहिलो तर माणसाचा मिडास होण्यास वेळ लागणार नाही. शिक्षितांच्या मनुष्यलक्ष्यी होण्याचा प्रवास ज्या दिवशी सुरू होईल तो दिवस सोनियाचा म्हणायचा.
                 



                      जाणिवांची आरास/१४४