पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






सार्वजनिक सत्यधर्म

        दोन दिवसांमध्ये एक रात्र असते की, दोन रात्रींमध्ये एक दिवस? असा प्रश्न केला तर काही उत्तर देतील की, ‘दोन दिवसांमध्ये एक रात्र असते तर काही ‘दोन रात्रींमध्ये एक दिवस असतो. असो. दोन्ही उत्तरे सापेक्ष असल्याने बरोबरच. ज्यांचे उत्तर दोन दिवसांमध्ये एक रात्र असे आहे, ते आशावादी होत. त्यांना जगातले उज्ज्वल अधिक दिसते. ज्यांचे उत्तर दोन रात्रींमध्ये एक दिवस आहे त्यांना निराशावादी म्हणावे लागेल. कारण त्यांना अंधार अधिक दिसतो आणि उजेड कमी. माझे उत्तर मात्र वेगळे आहे. ते आहे, ‘एक दिवसानंतर एक रात्र असते. हे प्रश्नाचे वस्तुनिष्ठ उत्तर. उत्तराचं असं का व्हावं? तर माणसं जीवनातील प्रश्न आपला वकूब, दृष्टिकोन आदींनी ठरवतात नि त्या अनुषंगाने ते सोडवतही असतात.
     आशावादी माणसं सकारात्मक असतात. “जग बदल घालुनि घाव यावर त्यांचा विश्वास असतो. तसेच, ‘बाबा, जग हे बदलायचे' अशी त्यांची धडपड असते. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातांवर तरलेली आहे. या तत्त्वज्ञानावर त्यांचा विश्वास असतो. अशी माणसं जीवनाबद्दल आश्वस्त असतात. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे यावर त्यांचा विश्वास असतो. अपेक्षा नि कृती अशा दोन्ही पातळीवर ही माणसं रचनात्मक दृष्टी ठेवतात. अशी माणसं प्रयत्नवादी व प्रयत्नशील असतात. 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान अशी नसणारी ही माणसं एकतर अल्पसंतुष्ट नसतात नि दैववादीही. पूजापाठ, व्रतवैकल्ये, कर्मकांडाने या जगात काही मिळत नसते. मिळते ते सारे कर्मयोगावर.


                        जाणिवांची आरास/१४१