पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मर्दानगी और कंडोम

        जाहिरात प्रचार, प्रसार, प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे खरे पण कधी कधी त्यातले तारतम्य हरवलेले दिसते. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. चुकीचा संदेश जातो. परवा मी स्कुटरवरून आयटी पार्कच्या जीवघेण्या रस्त्याने जात होतो. तेवढ्यात महापालिकेचा भरधाव मैलावाहू टँकर मागून पुढे गेला. मुळातच त्या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. अशात त्या टँकरचं असं अकारण भरधाव धावणं, त्यामुळे माझं धाबं दणाणलं. मनात मी काहीबाही पुटपुटत होतो. तेवढ्यात माझं लक्ष त्या टँकरमागं लिहिलेल्या कुटुंब नियोजनासंबंधी वाक्याकडं गेलं. 'मर्दानगी का इतना शौक है तो कंडोम का इस्तेमाल करो' असं काहीसं वाक्य होतं. 
        निरोध या गर्भनिरोधक साधनं, औषधे यांची जाहिरात लोकसंख्या कमी करण्याकडे कल वाढवणारी हवी. ती पुरुषार्थाचे उदात्तीकरण व स्त्रीचे खच्चीकरण करणारी असते. इतकेच नव्हे तर परस्त्री संबंध असणारच ही अटळ गोष्ट आहे असं या जाहिराती सूचित करतात, ही सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक गोष्ट आहे.
        स्त्री-पुरुष संबंध ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती सामाजिक नीतिनियमांवर आधारलेली असली पाहिजे. हे संबंध समाजमान्य चौकटीत असले पाहिजेत. पण या जाहिराती विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधांचे गौरवीकरण करणाच्या तसेच नकळत समर्थन करणाच्या, प्रोत्साहन देणाच्या असतात. आजवर आपण त्यांच्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नसल्याने शरीरसंबंधातील आक्रमकता, हिंसा, अत्याचार वाढत आहेत.

जाणिवांची आरास/१२९