पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

     ‘गाव सारं टग्यांचं बघ्यांचं असं एका लावणीतील वर्णन सार्थ करणारा खेड्यांचा चेहरा हा आजचा खरा चिंता आणि चिंतनाचा प्रश्न बनला आहे. वाढत्या माध्यम प्रभाव व प्रसारामुळे वृत्तपत्रे वृावाहिन्यांनी गाव ग्रासलेली आहेत. पूर्वी गाव एक पक्षीय होतं. बहुपक्षीय लोकशाही समृद्ध खरी. पण गावात वाढणाच्या पुढा-यांच्या संख्या व प्रभावामुळे तरुणाई राजकारणाच्या नादी लागल्याचे चित्र आहे. शहरात व गावात पुढा-यांच्या मागे धावणाच्या तरुणाचे तांडे माझ्या सारख्या शिक्षक, कार्यकर्त्यास अस्वस्थ करतात. पूर्वीही राजकारण्यामागे तरुणांचे तांडे, जत्थे होते. महात्मा गांधीच्या मागेपण होते. पण त्यामागे ध्येय होतं. ध्यास होता. विचार होता. आज तसे चित्र नाही. तरुण पदवीधर बेरोजगार आहेत शेतीशी त्यांची असलेली नाळ व नातं तुटत आहे, व्यवसायापेक्षा नोकरी बरी असा जनमताचा कौल झुकतो आहे. डेअरी, सोसायटी, शाळा, कॉलेज, साखर कारखाने, पतसंस्था या सर्व गावच्या प्रभावी राजकीय कार्यकर्त्यांच्या हाती आहेत तरुणांचे ताडे त्यांच्या मागे फिरण्यामागे नोकरीचं मृगजळ आहे. निराशेनं वैफल्याग्रस्त होणारे तरुण व्यसनाधीन होत आहे. छानछोकी रहाणी, ढाब्यांवरची भोजनावळ, मोटरसायकरवरील त्रिकुटांच्या सफरी, सटरफटर कारणासाठी शहराकडे जाण्याची हौस यात ही सारी मंडळी मशगूल आहेत. शेती विकून नोकरीसाठी लाखो रुपये मोजायला एका पायावर तयार असलेल्या तरुणांना हे पैसे घेऊन तू एखादा व्यवसाय घर, नोकरीसाठी शेती विकण्यापेक्षा शेती कर, शेती किफायतशीर होण्यासाठी म्हणून काही प्रयोग कर म्हणणारे पुढारी, कार्यकर्ते खेड्यात औषधाला सापडत नाहीत. खेड्यातील शिक्षक प्राध्यापकांनी आपली नैतिकता व्यावसायिक बांधिलकी व्यासंग सोडल्यामुळे मार्गदर्शक म्हणून पूर्वीचा त्यांचा 'आब' इतिहासजमा झालाय.
       अशावेळी गावातील ज्येष्ठ समाजधुरिणांनी राजकारणी गावाची मांडणी समाजकारणावर आधारित कारणे काळाची गरज आहे. पक्ष, गट, तट विसरून गावाच्या हिताच्या प्रश्नांवर एकवाक्यता, एकी, दिलजमाई गावचे केंद्र बदलून शाळा, ग्रंथालय, व्याख्यानमाला हे तरुणाई बदलाचं साधन म्हणून त्यांची राष्ट्रीय वृत्तीचे (राष्ट्रवादी नव्हे) समाजकेंद्री तरुण होण्यास वेळ लागणार नाही. या भूमिकाबदलचा स्वीकार अर्थातच आज राजकीय सत्ता हाती असलेल्या नेत्या, पुढा-यांनीच केला पाहिजे. राव करतील तेच गाव करेल अशी आज स्थिती आहे.

जाणिवांची आरास/१२८