पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रतिकूलतेशिवाय विकास नि समृद्धी अशक्य. जिथे सुबत्ता असते. तिथे सुस्तता येते. जिथे संघर्ष असतो, तिथे समृद्धी उदयाला येते. आचार्य विनोबा सर्वोदयाचे केंद्र म्हणून पवनार निवडतात. महात्मा गांधी जीवन शिक्षणासाठी सेवाग्रामला येतात. बाबा आमटे आनंदवन इथेच निर्माण करतात. कालिदास इथेच जन्मतो. सीमा, दमयंती, रुक्मिणी इथेच जन्मते. महानुभावासारखा उदार संप्रदाय इथेच विस्तारतो. अन् मधुकर केचे, सुरेश भट, विठ्ठल वाघ इथेच काव्य साधना करतात. याच भूमीने महाराष्ट्राला राष्ट्रसंत तुकडोजी व संत गाडगे बाबा दिले.

 अशा या भूमीतच वेदनेचे वेद उदयास येतात, हे इथल्या मातीच्या गुणामुळे! इथली माती मोठी माणूसप्रेमी. माणसं हळवी. प्रेमळ नि आतिथ्यशीलही. अजून इथे ग्रामगीतेच्या प्रभावामुळे असेल, पण ग्रामीण संस्कृती टिकून आहे. बोलीचं प्रेम जपावं इथल्याच माणसांनी. भोंडल्याची गाणी इथं अजून गुणगुणली जातात. भरीत-भाकरीचा भर्ता अजून चव राखून आहे. अहिरणी भाषेतील लोकगीतं इथं अजूनही घुमत असतात. माले-तुलेची इथली भोळी भाषा सानेगुरुजींच्या संस्काराची आठवण करून देते. रणरणती उन्हें अंगा-खांद्यावर झेलणाऱ्या इथल्या माणसांनी मूल्यांची रणकंदनं मात्र कधी केली नाही. विकासाचा अनुशेष भरून न काढल्यानं भकास राहिलेला हा प्रदेश वेदनेचे वेद गात झकास जगतो आहे. हे सारं पाहिलं की आपण पश्चिमेकडे का पाहतो हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो तो कायमचाच.

◼◼

जाणिवांची आरास/११०