पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





वेदनेचे वेद झाले

 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या विद्यमाने महामंडळ प्रतिवर्षी उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कार प्रदान करत असते. यावर्षीचा (२००६) हा पुरस्कार प्रदान सोहळा अमरावती येथे रविवार (२६ नोव्हेंबर) तेथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला. तेथील कवी सुरेश भट स्मृती प्रतिष्ठानने त्याचे संयोजन केले होते. या सोहळ्यास पुरस्कार विजेता म्हणून हजर राहण्याचा आनंद होता, पण त्यापेक्षा मला विदर्भाची साहित्य संस्कृती अनुभवायची होती.

 या सोहळ्यात वैदर्भीय कवी मधुकर केचे यांचा अभंग ‘वेदनेचे वेद झाले' सादर करण्यात आला होता. तो अभंग म्हणजे वैदर्भीय साहित्यनिर्मितीचा इतिहासच. आज विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या शोकात्म कालखंडातून मार्ग काढतो आहे. कापसाचे चुकारे न मिळाल्याने तो जसा आत्महत्या करतो तसा कर्जामुळेही! कर्ज पिकाचंच असतं असं नाही. लग्न, हुंडा, मानपान, प्रतिष्ठा, आदींच्या चक्रव्युहात सापडलेला तेथील शेतकरी फुकाच्या कर्जातही बुडतो आहे. हे तेथील रहिवासीच सांगतात, तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. विदर्भ म्हणजे वेदनेचा प्रदेश! प्रतिकूल निसर्ग, पण अनुकूल सांस्कृतिक समृद्धी हे या प्रदेशाचं वैशिष्ट्य. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर हे विदर्भाचे सारे नऊ जिल्हे मी यापूर्वी जवळून पाहिले आहेत. तिथे दीर्घकाळ राहून तिथल्या लोकांचं रसायन अनुभवलं आहे. तिथला निसर्ग, प्रतिकूलता, सांस्कृतिक व साहित्यिक समृद्धी, लोकसाहित्य, लोकपरंपरा, इतिहास मी जवळून न्याहाळला आहे. त्यावरून मी एका निष्कर्षाशी पोहोचलो आहे.

जाणिवांची आरास/१०९