पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





महाराष्ट्रीयांचा 'अंतर्नाद

 दिवाळी सरली, फराळ संपला. नाताळ तोंडावर आला. तरी माझ्या मनातला दिवाळीचा कैफ काही अजून उतरत नाही. हे दरवर्षीचेच असतं. फराळ खाऊन संपला की दिवाळी अंकांचे वाचन पुढच्या दिवाळीपर्यंत सवडीनं सुरू असतं. काही दिवाळी अंक आयुष्यभराचे सोबती बनून आहेत. त्यांच्याशिवाय दिवाळीची कल्पनाच मला असह्य होऊन जाते. ‘अंतर्नाद', 'ऋतुरंग', 'मौज', 'महाराष्ट्र टाईम्स', 'लोकसत्ता', 'साप्ताहिक सकाळ', 'साप्ताहिक साधना' हे असे दिवाळी अंक असतात की त्यांची बेगमी वर्षभर संगत करत राहते. दरवर्षी यापैकी असा एक दिवाळी अंक हाती येतो की, तो आयुष्याची एक नवी दृष्टी, उर्मी देतो. यावर्षी ‘अंतर्नाद' मासिकाचा दिवाळी अंक संपादक भानू काळे यांनी ‘श्रेष्ठ पुस्तके विशेषांक' म्हणून प्रसिद्ध केला आहे. ‘अंतर्नाद' मासिक सुरू होऊन तपपूर्ती होत आहे. पण हा अंक काही घरोघरी पोहोचला नाही. हे मासिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीस समर्पित आहे. हे मासिक सुरू झालं तेव्हा संपादक महोदयांनी 'अंक पसंत न पडल्यास पैसे परत' करण्याची योजना जाहीर केली होती. मनात वाचनाचा वसंत सतत फुलत राहायला हवा. वसंत असला की उसंत मिळते. उसंत मिळाली की पसंत ठरते.

 ‘अंतर्नाद'च्या या दिवाळी अंकात 'महाराष्ट्र टाईम्स', 'आकाशवाणी', ‘अंतर्नाद' यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या श्रेष्ठ मराठी पुस्तकांच्या याद्या दिल्या आहेत. शिवाय आजवर साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेल्या श्रेष्ठ रचनांची सूची आहे. ते सर्व वाचत असताना उगीच कल्पना येऊन गेली की लॉटरी (अगदी मटका ही!) लागली/लागला तर कुणीही ही सारी

जाणिवांची आरास/१११