पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाललीला वर्णन

 हिंदीत एक संत कवी होऊन गेले. सूरदास त्यांचं नाव. ते कृष्णभक्त होते. त्यांचा एकच काव्यग्रंथ आहे- 'सूरसागर'. त्यात त्यांनी कृष्णाच्या बाललीला वर्णिल्या आहेत. आधुनिक काळात बाललीलांकडे पाहण्यास जन्मदात्या आई-वडिलांना वेळ राहिलेला नाही. अशा काळात बालकांच्या हक्कांबद्दल कोणी तळमळत असेल यावर विश्वास बसत नाही. पण, आपल्या परिसरात प्राचार्य लीला पाटील नावच्या एक शिक्षण विदुषी (शिक्षणमहर्षी नव्हे!) आहेत. सृजनदायी शिक्षण आनंदी व्हावी म्हणून त्या सतत धडपडत असतात. अलीकडेच त्यांनी ऐंशी पूर्ण केले. त्या शिक्षणमहर्षी नसल्याने त्यांना अद्याप सहस्त्रचंद्र दर्शनाचा लाभ झाला नाही किंवा कुणी साधे फूल देऊन त्यांचे अभिष्टचिंतनही केले नाही. समाजाच्या या करंटेपणाला काय म्हणावे? समाजातील बाल्य सृजनशील व आनंददायी व्हावे म्हणून नाबाद ऐंशी असलेल्या या सृजनदायनीने अलीकडेच एक पुस्तक लिहिले आहे. 'बालक हक्क' आहे या पुस्तकाचा विषय. त्याविषयी जेव्हा मुलंच स्वतः बोलू लागतात तेव्हा ते शिक्षक, पालकांनी ऐकणे, वाचणे महत्त्वाचे होऊन जाते. हे पुस्तक माझ्या दृष्टीने ‘आधुनिक बाललीला वर्णन' होय. आधुनिक बालकांचे लीलाताईंनी केलेले संशोधन, सर्वेक्षण, विचार यांचे ते गंभीर विश्लेषण होय. ‘ग्रंथाली'ने हा ग्रंथ लीलाताईंच्या ८० व्या वाढदिवसादरम्यान प्रकाशित करून मोठे औचित्य साधले आहे.
 संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) बालक हक्कांचा जाहीरनामा प्रकाशित केला असून तो भारताने स्वीकारला आहे. ते हक्क अंमलात आणणे आपणा सर्वांवर बंधनकारक आहे. पण मुलांचं कोण ऐकतो! कर्त्या पिढीचे

जाणिवांची आरास/१०३