पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाल्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे आजची मुले नवे हक्क मागत आहेत. त्यांची घालमेल या पुस्तकात आहे. मुलांना वेगळे विचार मांडण्याचा हक्क हवाय, त्यांना हवाय शिक्षक, पालकांवर टीका करण्याचा हक्क. त्यांना हवं ते जाणून घेऊ इच्छितात, त्यांना प्रयोगशाळा वापरण्याचा हक्क हवाय! (हे राष्ट्रपतींना कुणी तरी कळवायला हवं!) मुलींना हवाय मनसोक्त वागण्याचा हक्क, मुलांना हवाय पालकांचे प्रेम मिळण्याचा हक्क. (नोकरी करणाऱ्या आई-बाबांसाठी हं!) हे नि असे अनेक नवे हक्क मुलांना हवेत. या बाललीला वाचल्या की मुलांची नवी पिढी किती प्रगल्भ होऊ लागली आहे हे ध्यानी येतं. लीलाताई पाटील, रेणूताई दांडेकर (दापोली), रेणू गावसकर (पुणे), शोभा भागवत, डी. बी. पाटील, रमेश पानसे, अभय बंग यांच्यासारखी काही मंडळी मुलांच्याबद्दल सतत विचार करतात. म्हणून इथे अजून ‘बाललीला' अनुभवास येते. अन्यथा इथे ‘हाताची घडी तोंडावर बोट' म्हणजे शिस्त, ‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम' म्हणजे खरे शिक्षण असा समज अजूनही दृढ नि रूढ राहिला असता. सर्व शिक्षण अभियानानंतरही इथे शिक्षक, प्राध्यापक मूल्यांकनास सामोरे जात नाहीत. कारण त्यांना बालकांनी केलेले त्यांचे वजन पेलणार नाही पण बालक हक्कासंदर्भात लीलाताई पाटील यांच्या सारख्यांच्या 'मुलंच जेव्हा बोलू लागतात' स्वरूपाची पुस्तकं प्रकाशित होत राहतील तर शिक्षणातील खारे वारे जाऊन मतलाई वारे (मतलबी नव्हे!) वाहू लागतील व बालकांचे हक्क बाललीला म्हणून समाज मोकळेपणाने स्वीकारेल. लीलाताई पाटील त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन योगाने हे घडून आले, तर ती भारतीय बालकांना देशाने दिलेली अमोल देणगी ठरेल.

***

जाणिवांची आरास/१०४