पान:जपानचा इतिहास.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वै.

९१


कोणा एका पोर्टगीज मनुष्यानें आपल्या पोर्तुगालच्या राजाला पाठविलेले पत्र मध्यंतरी एका डच मनुष्याच्या हाती लागलें. तें त्यानें प्रसिद्ध केलें. त्या पत्रांत असा मजकुर लिहिला होता कीं, " जपानच्या मिकाडोला पदभ्रष्ट करण्या करितां आपण जंगी फौज पाठवावी." त्याबरोबर डच व चिनी अशा दोन लोकांखेरीज इतर परदेशी लोकांना हाकून लावावें, अशी जपानी सरकारने सर्व परद्वीपस्थांवर करडी नजर केली.

 त्या वेळेपासून ह्मणजे १६२४ सालापासून डच व चिनी लोकांशिवाय इतर कोणाही परदेशीयाला जपानांत राहू देईनासे झाले. डच लोकांना राहण्याची परवानगी मिळाली खरी, परंतु त्यांनाही फार अपमान सोसून कमीपणानें रहावें लागत असे. त्यांनी फक्त ' नागासाकी ' बंदरा- जवळील 'देशीमा ' ह्मणजे ' बहिर्द्वाप' नांवाच्या बेटांत रहावें, असें होतें. त्यांच्या बेटाच्या व नागासाकी बंदराच्या मध्यंतरीं जो पूल होता, त्या पुलावर नेहमी मुक्त पहारा असे. प्रथम तर त्यांना एक जहाजापेक्षां जास्ती भरतीचा माल विक्रीकरितां आणण्याची सक्त बंदी असे, परंतु पुढें आठ जहाजें माल भरून आणण्याची पर- वानगी मिळाली. डच रेसिडेंटला वर्षातून एकदा मोठमोठ्या किंमतीचे जिन्नस नजराण्याला घेऊन येड्डी येथें राजकर्त्याच्या भेटीला जावे लागत असे. तो त्या वेळीं शोगुन पडद्याच्या आड बसलेला असे. पडदा दिसूं लागल्याबरोबर तो डच मनुष्य दोन्ही हात व पाय टेंकून चालू लाग. पडद्याजवळ गेल्यानंतर तो गुढगे व डोके टेकून दंडवत घाली. नंतर आलेल्या रीतीनेंच माघाराही जाई.