पान:जपानचा इतिहास.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १४ वे.

७७


 लाखी काम - लांकूड, धातु, कागद इत्यादिकांच्या पदार्थावर, टिकाऊ व चकचकीत असें जे ते वार्निस करितात त्यास लाखी काम असें ह्मणतात. ही कला जपानी लोक चिनी लोकांपासून शिकले. परंतु ती त्यांनी आतां इतक्या उत्कृष्ट दशेला आणली आहे कीं, असल्या लाखी कामाला यूरोपियन लोक आतां 'जपानी लाखी काम' असें ह्मणतात.

 लाख कामाचें वार्निस एका प्रकारच्या झाडाच्या चिकापा- सून तयार होते. हा झाडाचा चीक जमा करून त्यावर आपलें पोट चालविणारे असे पुष्कळ लोक आहेत. साधारण जिन- साला रोगण चढवावयाचें ह्मणजे तेव्हांच होतें, परंतु मौल्य- वान् जिनसांवर रोगण चढवावयाचें त्याला पुष्कळ दिवस लागतात. एका प्रकारच्या वार्निसाचा थर वाळला कीं तो घोंटून त्याच्यावर दुसरा, तो वाळला कीं त्याच्यावर तिसरा, असे अनेक प्रकारचे थर एकावर एक वार्निसाचे देतात. "जिन्नस ज्या तोलाचा असेल त्या मानानें सोन्याची, रुप्याची अगर जस्ताची भुकटी त्याजवर टाकून पुन्हां वार्निसाचें कलम फिरवितात. त्या योगानें त्या त्या जिनसाला एक प्रकारची शोभा येते. लाखी कामाच्या सामान्य प्रतीच्या जिनसाला फार किंमत पडत नाहीं. परंतु हजारों रुपये किंमत पडणारेही लाखी जिन्नस असतात.

 लाखी काम ज्यावर केलें आहे, अशी भांडी आपल्या वापरामध्ये जपानी लोक पुष्कळ घेतात. त्यांच्या लाखी भांड्यांत कसलेही पदार्थ घातले, तरी त्या भांड्यांस विशेष कांहीं खराबी येत नाहीं.