पान:जपानचा इतिहास.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
जपानचा इतिहास.

तर त्या मानाने आंत काळोख पडतो. त्या लोकांना संवय झाली असल्यामुळे ह्या अडचणीचें कांहीं वाटत नाहीं. तथापि कांहीं जपानी लोक आपली घरें यूरोपियन धर्तीवर बांधू लागले आहेत.

 जपानी घरांना आगीची फार भीति असते. कित्येक जपानी असे आढळतात कीं, ते असल्या आगींत सांपडून सात आठ वेळ भाजलेले आहेत. रस्तोरस्ती उंच उंच शिड्या व त्यांजवळच घांटा टांगून ठेवलेल्या असतात. कोठें आग लागली तर ह्या शिड्यावरून पाहून आसपासच्या लोकांना तिची इशारत ताबडतोब देण्यांत येते. व्यापारी वगैरे श्रीमंत लोक आपली धान्यसामुग्री वगैरे सामान घरापासून कांहीं अंतरावर तळघरे बांधून त्यांत ठेवतात. त्या तळघरांच्या भिंती मजबूत असतात.

 लांबून एखादें जपानी शहर पाहिलें ह्मणजे, हा कां गृह- समुद्र आहे की काय, असा भास होतो. जिकडे पहावे तिकडे गिड्डया गिड्डयां घरांचीं सांवळ्यांचीं अगर कौलांची छपरें दिसतात. मधून मधून तळघरांचें निमूळतें, शिखर एखादें वेळी दिसलें तर दिसलें. जपानी देवालयें इतर घरांच्यापेक्षां उंच असलीच तर फारच थोडीशी असतात. एकादा मनोरा किंवा / एकादा घुमट दिसला तरी तो त्यांच्या आसपास आलेल्या वृक्षांच्यावर फारच थोडा आलेला असतो. शहरांत चोंहोंकडे ठिकठिकाणीं वृक्षपुंजक दृग्गोचर होतात, त्या योगानें मात्र दृष्टया एकतानतेचा भंग होतो.

______