पान:जपानचा इतिहास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २रें.

१३


आग लागली. चोहोंकडे दिवस असल्याप्रमाणे चकचकाट दिसूं लागला. अग्नीच्या मुखांतून निघणाऱ्या कृष्णवर्ण धूम्रा सर्व आकाशमंडळ व्याप्त झालें. त्या दिवशीं ज्यांनीं आपलें संरक्षण करण्याची पूर्व तरतूद करून ठेवली नव्हती, ते लोक बहुतेक सर्व घरांखालीं सांपडून चेंगरून मरून गेले. बाकीचे अग्निमुखी पडले. कांहींजण रस्त्यावर येऊन उभे राहिले. एका मागून एक धक्के बसतच होते. परंतु पुढे पुढे त्यांचा जोर कमी झाला. व नंतर अठरा दिवसांनी ते अगदी बंद झाले. त्या प्रसंगी १०००० लोक प्राणास मुकले असावेत असा अंदाज आहे.

 इ. स. १८९१ च्या आक्टोबर महिन्यांत टोकियो शहरा- पासून दीडशें मैलावर एका प्रांतांत एक भयंकर भूकंप झाला. सुगीचा सण साजरा करण्यासाठी ओगाकी गांवामध्यें पूर्व होंगांगी नांवाच्या देवळामध्ये सुमारें तीनशें लोकांचा समुदाय जमला होता. धक्का बसल्याबरोबर त्या देवळाची ती इमारतच्या इमारत एकाएकीं खालीं आली, व आंत जमलेल्या एकूणएक लोकांचा चक्काचूर झाला. नंतर अकस्मात् आग लागली, व त्या इमारतीबरोबर तीनशें प्रेतांची जळून राख झाली. नागोय व गिफू ह्या दोन शहरांच्या दरम्यान असलेली बहुतेक सर्व खेडीं जमीन दोस्त झाली. त्या प्रलयानें ७५२४ लोक मेल्याची गणना आहे. व कमीत कमी त्यावेळीं एक लक्ष सासष्ट हजार घरे उध्वस्त झाली असावी असें ह्मणतात.

 इ. स. १८९६ त जपानांत भूकंपाने दहा हजार मनुष्यें गतप्राण झाल्याचे वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालें होतें.