पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताण निश्चितच कमी होऊ शकतो. घराची रचना सुटसुटीत असणे आणि घरातल्या वस्तू त्या त्या जागी असणे ही वेळेच्या व्यवस्थापनामध्ये एक उपयुक्त बाब ठरते. यासाठी घरातील स्त्रीने स्वत:ची कामे नीट करावीत आणि त्याबरोबरच घरातील प्रत्येकाची घरगुती कामे नीट होण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचा आग्रह धरावा. घरातले वातावरण खेळकर राहण्यासाठी इतरांनी मदत करणे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी इतरांनी आपली मानसिकता 'घरातील स्त्री नोकरी करते' यासाठी बदलणे हे महत्त्वाचे ठरते. काम करणाऱ्या स्त्रीने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावेच. त्यासाठी तिने नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची पातळी तपासणे, कार्डिओग्राम काढणे, पन्नाशीनंतरच्या स्त्रियांनी आपल्या हाडांचा ठिसूळपणा तपासून घेणे अशा अनेक बाबींचा समावेश यांत होतो. आजारपण नाही म्हणून आपण कसेही वागलो तरी चालेल हा गैरसमज स्त्रियांनी काढून टाकावा. कामाचे तास हे ठरावीकच असावेत. ओव्हरटाईम न करता शरीराला झेपेल तितकेच काम करावे आणि ‘कामाच्या वेळी काम आणि विश्रांतीच्या वेळी विश्रांती' हा नियम पाळणे आवश्यक असते. पुरेशी, वेळेवर झोप ही बाब जशी महत्त्वाची, तसाच 'सकस आणि वेळेवर आहार' हा नियमही महत्त्वाचा असतो. आहारात लोहांचे, प्रथिनांचे आणि इतर अन्नघटकांचे प्रमाण संतुलित असावे याकडे कटाक्ष ठेवावा. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी वारंवार बाहेरचे खाणे टाळावे. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी ऊठसूट चहा घेण्याची सवय अधिक आढळते. हे टाळल्यास उपयुक्त ठरेल. कामाच्या ठिकाणी आहार अत्यल्प घेणे हेही हानिकारक असते. बस किंवा स्वयंचलित दुचाकीने प्रवास होत असेल तर व्यायाम हा कटाक्षाने करायलाच ९८ । जगण्यात अर्थ आहे..