पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हवा. ज्या स्त्रिया नियमित व्यायाम करीत नाहीत, त्यांना कुठले ना कुठले आजारपण कधीतरी गाठते हे लक्षात ठेवावे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी आठवड्याची सुट्टी घ्यावी आणि ती सुट्टी आनंदात, उत्साहात आणि काही वेगळे छंद जोपासून घालवावी. आठवड्याची सुट्टी जशी महत्त्वाची तशी वर्षातून एक-दोनदा अधिक दिवसांची कुठली तरी लांब पल्ल्याची सहल काढणे हे आरोग्याच्या दृष्टीने आणि ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने हिताचे असते. ऑफिसच्या ठिकाणचा ताणतणाव कमी करण्यासाठी केवळ त्या स्त्रीने उपाययोजना करून चालत नाही तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी, वरिष्ठांनी आणि संस्थेने म्हणजे संस्थेच्या संचालकांनी वेळीच वाजवी हस्तक्षेप करणे आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तीत सुसंवाद प्रस्थापित करणे हे या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. वरिष्ठांशी उत्तम संबंध ठेवणे आणि अर्थातच ते निकोप ठेवणे ही व्यक्तिगत पातळीवरची बाब आहे. त्या दृष्टीने स्त्रीने तसे प्रयत्न करायला हवेत. कामाची वेळ सांभाळणे, कामाची शिस्त सांभाळणे तसेच आपल्यावर टाकलेली जबाबदारी किंवा आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे, व्यवस्थितपणे आणि बिनचूक करणे या गोष्टी ताणतणाव कमी करायला मदत करतात. चांगले, मृदू बोलणे याबरोबरच खरे बोलणे ही गोष्ट ताणतणाव कमी करायला मदत करते. वारंवार चेष्टेने, बढाईखोरपणे किंवा एखाद्याची टिंगलटवाळी करत बोलण्याची सवय असेल तर तिने ती सवय काढून टाकावी. कामाच्या ठिकाणचे एकंदर वातावरण हे जितके निकोप, पारदर्शक राहील तितका फायदा त्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होतो. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये स्त्री अधिक धाडसी, आक्रमक झालेली आहे; घराबाहेरील 'ती'चा ताण । ९९