पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घरातले वातावरण उत्तम असेल तर या कामाचा ताण, तिला ताण वाटत नाही. पण घरातच काही तणाव, अडचणी असतील किंवा कुटुंबातील व्यक्तींमध्ये विसंवाद असेल तर कामाचे रूपांतर निश्चितच ताणात होते. नवरा सुशिक्षित, सुस्वभावी, सुसंस्कृत असेल तरच नोकरी करणाऱ्या स्त्रीला ताणतणावाच्या शक्यता कमी असतात. अन्यथा प्रत्येक गोष्टीसाठी तिला थेंब थेंब रक्त आटवावे लागते. नवरा संशयी असेल आणि बारीकसारीक गोष्टीसाठी तिला खूप त्रास सहन करावा लागत असेल तर स्त्रीला घराबाहेर पडणेही मुश्कील होते. काम करणाऱ्या स्त्रियांना ताणतणाव असेल तर त्याचे व्यवस्थापन दोन स्तरांवर करता येते. कौटुंबिक ताणतणावाचे व्यवस्थापन आणि कामाच्या ठिकाणच्या ताणतणावाचे व्यवस्थापन. कौटुंबिक पातळीवरील ताणतणाव हे स्त्रीच्या बाबतीतही पुरुषांच्या ताणतणावाइतकेच महत्त्वाचे असतात. त्यांची सोडवणूक व्यक्तिगत पातळीवरच करावी लागते. अर्थात नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे ताणतणाव ती नोकरी करते म्हणून उद्भवलेले असतात. अशा स्त्रीने कुटुंबातील व्यक्तींबरोबर संवाद साधणे गरजेचे असते. हा संवाद जितका निरामय तितका ताणतणाव कमी होण्याची शक्यता अधिक खुलेपणाने घरातल्या व्यक्तींबरोबर विशेषतः पतीबरोबर किंवा सासू, सासरा, दीर, मुले यांच्याबरोबर संवाद झाला तर ताणतणाव निवळण्यास निश्चितच मदत होते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी 'ऑफिस' घरी आणण्याचा प्रयत्न करू नये. ऑफिसातील काम ऑफिसमध्येच करणे हे त्यांच्या दृष्टीने एक चांगले पाऊल ठरते. घरी आल्यानंतर ऑफिसातून फोन आला किंवा ऑफिसच्या कामासाठी फोन आला किंवा सहकाऱ्याचा नको असलेला फोन आला तर त्याचे पडसाद घरात उमटू शकतात आणि त्याचे रूपांतर ताणतणावात होऊ शकते. वेळेचे व्यवस्थापन (टाईम मॅनेजमेंट) हा यातील कळीचा मुद्दा ठरू शकतो. घरात करावयाची कामे नेमक्या पद्धतीने, शिस्तबद्धपणे आणि सुटसुटीतपणे केली तर घरातील कामाचा घराबाहेरील 'ती'चा ताण । ९७