पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देणग्या मिळालेल्या असतात. अनेक चांगले गुण मिळालेले असतात. पण जसे टोपलीतील एक कुजलेले फळ बाकीची फळे कुजवते, त्याचप्रमाणे राग हा एकच अवगुण इतर गुणांचे अवमूल्यन करतो. राग न येणारी, स्वभावाने शांत- मनमिळावू असणारी, सदैव हसतमुख असणारी व्यक्ती कोणालाही आवडते. रागीट व्यक्तीचा सहवास मात्र कोणाला हवाहवासा वाटत नाही. रागीट माणसाच्या असण्यामुळे – बाह्य वातावरणात सर्वत्र शांतता असू शकते, पण – अशा व्यक्तीच्या सान्निध्यात असणाऱ्या इतरांच्या अंतर्मनाची शांती-समाधान नष्ट पावते. कुटुंबातील कर्ता माणूस जर रागीट असेल तर, घरातील वातावरणात एक प्रकारचा ताण जाणवत राहतो. अशा व्यक्तीजवळ जायला शेजारचीच नव्हे तर स्वत:च्या घरातील मुलेदेखील घाबरतात. इतकेच नव्हे, अशा रागीट व्यक्तीला अगदी प्रिय असणाऱ्या व्यक्तीच्या मनातही सतत एक प्रकारची धागधुग असते की, कधी हा माणूस तडकेल आणि एकदम चिडून उठेल. घरातील वातावरण जर निकोप असेल तर त्याला 'घर' म्हणता येते. एखादी व्यक्ती विनाकारण राग करणारी असेल तर घरातले वातावरण निकोप राहत नाही. अशा घरात ती रागीट व्यक्ती आपलेच सारे खरे, अशा थाटात वावरत असते. आपण ज्यावेळी समोरच्या व्यक्तीवर रागावतो, त्यावेळी आपण सर्वज्ञ असल्याची भ्रामक कल्पना करून घेतो. समोरच्या व्यक्तीला निर्बुद्ध ठरवतो. अर्थात अशा वेळी अनेक (सुचेल त्या) अर्वाच्य विशेषणांचा वापर करून त्या व्यक्तीला हिणवतो. अशा प्रसंगी शिवीगाळ करण्याने आपलेच मूल्य कमी होत असते. एखादी वस्तू एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला देऊ केली पण ती त्या व्यक्तीने स्वीकारली नाही तर ती वस्तू दुसऱ्याची होत नाही. त्यावर पहिल्या व्यक्तीचीच मालकी राहते. शिवीचे किंवा अर्वाच्य शब्दांचे देखील तसेच असते. शिवीगाळीमुळे समोरची व्यक्ती दुखावली तर जातेच; पण काही काही वेळा असा प्रसंग त्या व्यक्तीच्या मनात घर करून राहतो आणि त्यातून वेगळेच काही तरी निर्माण होते. श्रीमंत राग नावाचा रोग । ४९