पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नजरेआड करत आपल्या दैनंदिन व्यापांत गढून जातो. कारण आज आपले अवघे जीवन धावपळीचे झालेले आहे. या धावपळीच्या जीवनात जो-तो आपल्याच विशिष्ट वातावरणात रमला आहे. या वैयक्तिक, कौटुंबिक कवचाबाहेरच्या जगाकडे लक्ष द्यायला, त्याविषयी विचार करायला बहुधा कोणाला वेळच नाही. जर अशी एखादी घटना आपल्या किंवा कुणा आप्तस्वकीयाच्या बाबत घडली तर मात्र आपण केवळ त्याचाच विचार करायला लागतो. अशी वेळ कधी आली तर (आली नसेल तर तशी कल्पना करून बघावी) त्याचा खूप गांभीर्याने विचार करून त्या घटनेचा सर्व बाजूंनी वेध घेऊ लागतो. त्या घटनेशी निगडीत व्यक्तित्वांचा शोध घेतो आणि अशा घटनेच्या मुळाशी, मूळ कारणापाशी येऊन पोचतो; त्यावेळी लक्षात येते की, हे कारण क्षुल्लक असो अगर नसो त्याच्या मुळाशी असतो तो कुणाचा तरी, कुणावर तरी, कशासाठी तरी क्रोध, राग, संताप...! क्रोध-राग ही अशी एक भावना आहे की, जी माणसाला क्षणात पशू बनवते. ज्याप्रमाणे एखादी लहानशी काडी संपूर्ण इमारत - शहर जंगल भस्मसात करू शकते, जहाजाला पडलेले लहानसे छिद्र जहाजाला तळाशी नेऊ शकते, मोहाचा एक क्षण एड्ससारखा महाभयंकर विकार देऊ शकतो, एक छोटा बाँब प्रचंड मनुष्यहानी आणि वित्तहानी घडवून आणतो... त्याचप्रमाणे रागाचा एक क्षण एखाद्या व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करू शकतो. घटस्फोट घडवून आणू शकतो. अनेक वर्षांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण करतो. कारण रागाचा एक क्षण माणसाला विकृत बनवतो. वाईट विचार, पापी कृत्य करण्यास भाग पाडतो. शहाणा मनुष्य वेड्यासारखा वागतो, काही वेळा समोरच्या व्यक्तीचा खूनसुद्धा करतो आणि क्षणाचा क्रोध हा जन्मभराचा तुरुंगवास घडवतो. यातून दुसऱ्या व्यक्तींमध्ये क्रोधाची निर्मिती होते आणि खुनाचे उत्तर खून अशा बेगडी - फसव्या स्वाभिमानापोटी सूडचक्र - खूनसत्र सुरू राहते. आयुष्य म्हणजे परमेश्वराने आपल्याला बहाल केलेला एक नजराणा आहे. अशा सुंदर आयुष्यात बुद्धी, सौंदर्य, संपत्ती, आरोग्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, सचोटी यांसारख्या अनेक ४८ । जगण्यात अर्थ आहे..