पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विशेषत: पुरुषाने 'वधू सौंदर्यवती असावी' अशी अपेक्षा करताना सौंदर्य म्हणजे काय याचा थोडा तरी विचार करावा. मनाला आनंद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा, वस्तूचा, व्यक्तीचा गुण म्हणजे सौंदर्य होय. । खरोखर मंगलमय असते तेच खरे सौंदर्य असते. सौंदर्याचे दुसरे नाव म्हणजे सत्य. जे जे उपयुक्त असते ते सारे सुंदरच असते. आनंदी वृत्ती आणि समाधान ही दोन महत्त्वाची सौंदर्यवर्धक साधने आहेत. सद्गुणी स्त्री ही एखाद्या स्वर्गीय फुलाप्रमाणे असते. सुरेख, निर्मळ आणि निष्कलंक. अशी स्त्री म्हणजे जगातील अत्यंत सुंदर स्त्री होय. गोरेपणा किंवा बाह्य शारीरिक सौंदर्य म्हणजे खरे सौंदर्य नव्हे. प्रेमळपणा, आत्मसमर्पण व स्वजनसेवेत आनंद या तिन्हीमधून स्त्रियांचे जे अनिवार्य रूप दिसून येते ते गौरवर्ण, नटणे-मुरडणे यांतून कधीच दिसणार नाही. पण हे कळण्यासदेखील सौंदर्यदृष्टी लागते. आज बहुतेक व्यक्ती बाह्यसौंदर्य हेच खरे सौंदर्य मानतात आणि मानसिक सौंदर्याकडे, व्यक्तीच्या सुंदर, अकृत्रिम स्वभावाकडे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकडे डोळेझाक करतात. सर्वगुणसंपन्न पण बाह्यकांती गोरी नसलेल्या व्यक्तीकडे दुर्दैवाने दुर्लक्ष होते. अशा व्यक्ती स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:ला सिद्ध करून दाखवतात. या व्यक्तींच्या हातून अद्भुत कार्ये घडतात. कारण उद्योगप्रियता, बुद्धिमत्ता, सद्भावना आणि सातत्य यांसारखे अनेक गुण त्यांच्या अंगी असतात. संसार ही एक लढाई आहे. हा एक यज्ञ आहे. संसार म्हणजे चैन नसून एक कर्तव्य आहे. विचार, अनुभव आणि श्रद्धा यांचे ते घनफळ आहे. या संसारातील सर्व गोडी आपुलकीच्या जिव्हाळ्याने केलेल्या लहान-सहान गोष्टींत आहे, एकमेकांच्या सुखदुःखांत समरस होण्यात आहे, हे समजून घेतले पाहिजे. संसार म्हणजे पुनवेचे चांदणे नव्हे की ज्यात कमलांनी फुलून एकमेकांचे स्पर्शसुख अनुभवत वाऱ्याच्या झुळुकेबरोबर स्वच्छंद डुलत राहावे. हास्य आणि अश्रू यांचा सुरेख रंग नको, अंतरंग पाहा । १९९