पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिच्यात अधिक धिटाई आलेली आहे; या गोष्टी खऱ्या. त्यामुळे कडव्या प्रतिकाराला ती सक्षम झालेली आहे असे मानायला जागा आहे. लैंगिक शोषणाचे प्रकार तिने सहन करू नयेत आणि घडू देऊ नयेत. आज सिनेमा, दूरदर्शन, एवढेच नव्हे तर विविध नियतकालिकांच्या जाहिरातींत कोणते चित्र दिसते? आधुनिकतेच्या नावाखाली स्त्री केवळ शोभेची आणि त्याहीपुढे जाऊन ‘उपभोग्य' वस्तू अशी प्रतिमा सर्वांसमोर ठेवली जाते. अशा जाहिरातींतून लैंगिक आकर्षणाला उत्तेजन देणारे वातावरण निर्माण केले जाते. याचा कळत-नकळत परिणाम समाजमनावर होतो. त्यामुळे धाडसी, स्वतंत्र, साहसी अशी कितीही विशेषणे चिकटली तरी 'योग्य सुरक्षित अंतर ' राखणे हा लैंगिक शोषणावरील आणि ताणतणाव निर्माण होण्यावरील प्रतिबंधक उपाय आहे. एखाद्या सहकाऱ्याचे किंवा वरिष्ठाचे वर्तन संशयास्पद वाटले तर आपल्या हितचिंतक सहकाऱ्यांना त्याबद्दल कल्पना द्यावी. कुटंबातले वातावरण चांगले असेल तर पतीला आणि आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याला कल्पना द्यावी आणि नंतर आपल्या कुटुंबीय आणि हितचिंतकांच्या साहाय्य - सल्ल्याने योग्य ते पाऊल उचलावे. एकाकीपणे भलतेच धाडस करू नये. ताणतणावाच्या अशा सर्व संभाव्य कारणांचा विचार करता, नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मन मोकळे करून बोलण्यासारखे कुटुंबातील वातावरण असावे हे अनेक दृष्टींनी फायद्याचे असते. जीवन आहे तिथे ताण असणारच. मनापासून भरपूर काम, पुरेसा व्यायाम, सकस आहार, न्याय्य तेवढ्याच मिळकतीचा आग्रह, अवाजवी मोहाचा त्याग, मनमोकळी उचित मैत्री, आवश्यक मनोरंजन, पुरेशी विश्रांती, धैर्य, धीर आणि संयम यांचा अवलंब करून समस्या कमी होऊ शकतात. साहजिकच ताणही कमी होऊ शकतात, इतके की ते आपण सहन करण्याच्या मर्यादेत राहतात आणि मर्यादित ताणांची माणसाला गरज असतेच. सारे काही 'ईझी गोईंग ' असते तर श्रम करावेत, अभ्यास करावा असे माणसाला वाटणारच नाही. आपल्या कुटुंबात कुणाला ताण नाही ना? १०० । जगण्यात अर्थ आहे..